मराठी सृष्टीत मुख्य अभिनेत्री साकारल्यानंतर बहुतेक अभिनेत्री दिग्दर्शन तसेच निर्मिती क्षेत्राकडे वळालेल्या पाहायला मिळतात. अगदी सई ताम्हणकर, तेजश्री प्रधान, प्राजक्ता माळी, मनवा नाईक या अभिनेत्रींनी देखील अशा क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले. आता याच यादीत आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती क्षेत्रात उतरलेली पाहायला मिळत आहे. चेकमेट, सावरखेड एक गाव, हृदयांतर, तेरे लिये, नवरा माझा भवरा अशा हिंदी तसेच मराठी चित्रपटातून अभिनेत्री सोनाली खरेने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

काल ८ मे रोजी मदर्स डेचे औचित्य साधून सोनालीने तिच्या ‘Blooming lotus productions’ या निर्मिती संस्थेची घोषणा केली आहे. महत्वाचं म्हणजे याच दिवशी तिने आपल्या निर्मिती संस्थेच्या पहिल्या चित्रपटाची देखील घोषणा करून एक सुखद धक्का दिला आहे. आई मुलीच्या नात्यावर भाष्य करणारी ‘My लेक’ या नावाने तिचा हा आगामी चित्रपट असणार आहे ज्यातून प्रेक्षकांना माय लेकीच्या नात्यातला गोड, आंबट आणि तिखटपणा असा तिन्हींचा आस्वाद घेता येणार आहे. पती विजय आनंद यांच्या प्रेरणेनेच सोनालीने निर्मिती क्षेत्रात येण्याचे आव्हान पेलले आहे. विजय आनंद हे बॉलिवूड चित्रपट अभिनेते आहेत “प्यार तो होना ही था” या बॉलिवूड चित्रपटातून विजय आनंद यांनी काजोलच्या प्रियकराची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘आसमान से आगे ‘, ‘यश’, ‘ये रे ये रे पैसा’, ‘स्माईल प्लिज’ हे चित्रपट आणि काही हिंदी टीव्ही मालिकेतून मुख्य भूमिकेत झळकले आहेत. काही मराठी चित्रपटातुनही ते महत्वाची भूमिका साकारताना दिसले आहेत.

‘My लेक’ या चित्रपटात सोनाली खरेची लेक सनाया आनंद सुद्धा झळकणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा चित्रपट खूपच खास ठरणार आहे. सनाया आनंद हिने सई देवधर दिग्दर्शित “Blood relation” शॉर्टफिल्ममधुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. My लेक हा तिने अभिनित केलेला पहिलाच चित्रपट ठरणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या चित्रपटातून ती तिची आई सोनाली खरे सोबत स्क्रीन शेअर करणार आहे . आपल्याच निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सोनाली तिच्या लेकीला मोठा प्लॅटफॉर्म मिळवून देताना दिसत आहे त्यामुळे रिअल लाईफ मधल्या या मायलेकी ऑनस्क्रीन कशा पद्धतीने प्रेक्षकां समोर येतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे. या निर्मिती संस्थेसाठी आणि आगामी चित्रपटासाठी सोनाली खरेचे अभिनंदन आणि शुभेच्छा!