सिनेमासृष्टीत तुमचं कामच बोलत असतं असं म्हणतात. एका कामातून दुसरं काम मिळण्याची संधी निर्माण होत असते. पण ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर यांच्याबाबतीत मात्र हा अपवाद ठरला. इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी ज्याप्रमाणे कलाकारांचा कनेक्ट असायाला हवा तसा त्यांच्याबद्दल थोडा जरी चुकीचा संदेश इंडस्ट्रीत गेला तर त्याचे परिणाम काय होतात हे सतीश पुळेकर यांच्याइतकं कुणी जाणू शकणार नाही. सतीश पुळेकर यांनीच ही खंत बोलून दाखवली. मुंबईकर असलेल्या सतीश पुळेकर यांचं शालेय आयुष्य दादरमध्ये गेलं. ८० च्या दशकात मराठी सिनेमा आणि नाटक या माध्यमात सतीश पुळेकर हे नाव चर्चेत होतं. सुरूवातीच्या काळात नायक, नंतर खलनायक आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत सतीश दिसले.

त्यांच्या काही खास भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. खरंतर क्रिकेटमध्ये त्यांना रूची होती, मात्र क्रिकेटसाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना क्रिकेटच्या मैदानावर चौकार मारता आले नाहीत. वडिलांचा घड्याळ दुरूस्तीचा छोटा व्यवसाय असल्याने क्रिकेटसारखा महागडा खेळ त्यांना परवडणारा नव्हता. खेळाची आवड असल्याने त्यांनी खोखो आणि लंगडी खेळात करिअर केलं. विजय क्लबने यासाठी सतीश यांना पाठबळ दिलं. बरीच वर्ष खेळातच रमलेले सतीश त्यानंतर मात्र अभिनयाच्या प्रांतात आले. कॉलेजमध्ये नाटक एकांकिकेच्या निमित्ताने त्यांची अभिनय आणि दिग्दर्शनाशी गट्टी जमली. नाटकातून सिनेमा आणि मालिकांकडे वळलेल्या सतीश पुळेकर यांच्यावर एक असा शिक्का बसला की त्यामुळे त्यांच्याविषयी चुकीचा संदेश पसरला गेला. त्यांना काम न मिळण्यासाठी हे कारण ठरलं. नाटकाची पार्श्वभूमी असल्याने सतीश वेळ पाळण्याबाबत आग्रही असायचे, पण त्यांचा हाच गुण सिनेमाक्षेत्रात त्यांचा शत्रू बनला. सतीश यांचा स्वभाव सहकार्य करण्याचा नाही, ते वेळेबाबत अडेलतट्टू आहेत, त्यांना लगेच राग येतो, राग आला तर मध्येच काम सोडून जातात अशा अफवा त्यांच्याविषयी पसरल्या आणि त्यांच्याकडे काम येणं बंद झालं. सतीश यांनीच हा अनुभव सांगितला.

सतीश सांगतात, सिनेमा इंडस्ट्रीत काम मिळवण्यामध्ये एकमेकांची नावं सुचवली जातात. माझ्याबाबतीत पसरलेल्या अफवांमुळे माझं कुणीही नाव सुचवेनासं झालं. त्याचा फटका मला महिनोंमहिने काम मिळण्याला बसला. चांगला अभिनय, दिग्दर्शनाचं कौशल्य असूनही माझ्याकडे कामं यायचं बंद झालं. मी वेळेबाबत, कामाबाबत शिस्तीचा होतो आजही आहे, पण माझ्या अंगी असलेली कडक शिस्त म्हणजे सेटवर इतरांसाठी त्रासदायक ठरेल असा समज पसरवला गेला. आजही मला या गोष्टीची खंत वाटते. काही वर्षापूर्वी आम्ही दोघी या मालिकेत सतीश पुळेकर आनंदमामा या भूमिकेत दिसले. सतीश पुळेकर यांनी प्रशांत दामले, विजय कबरे, प्रदीप पटवर्धन यांच्यासोबत काही सिनेमात काम केलं. नाटकांमध्येही त्यांच्या भूमिका गाजल्या. मात्र कामात सातत्य न राहण्यासाठी त्यांच्या स्वभावाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. आज मुंबईत रानडे रोड परिसरात सतीश पुळेकर हे पत्नीसोबत वास्तव्य करत आहेत. आयुष्याच्या या टप्प्यावर सिनेमाइंडस्ट्रीतील अनुभव शेअर करताना पुळेकर यांनी एक दुखरी बाजू दाखवून दिली.