
मराठी चित्रपट, मालिका तसेच नाट्य अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले असल्याचे समोर आले आहे.आज ९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७ वाजता गिरगाव ठाकुरद्वार येथे राहत्या घरी त्यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. मोरूची मावशी या गाजलेल्या नाटकातून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. रंगभूमिपासून त्यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. चित्रपट , दुर्दशनवरील मालिका आणि नाटक आशा तिन्ही माध्यमातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, विजय पाटकर यांच्यासोबत त्यांचे चांगले सूर जुळून आले होते.

विनोदी भूमिका असो वा खलनायकी ढंगाच्या भूमिका प्रदीप पटवर्धन यांनी त्यांच्या अभिनयाच्या ताकदीने उत्तम निभावल्या होत्या. लावू का लाथ, नवरा माझा भवरा, नवरा माझा नवसाचा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, सुखांच्या सरींनी हे मन बावरे, महाराष्ट्राची हास्यजत्रा , मेनका उर्वशी अशा विविध चित्रपट मालिका तसेच विनोदी कार्यक्रमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिले. कॉमेडी एक्सप्रेस या शोमुळे मला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली , या शोमुळे विनोदी अभिनयाची छाप मी प्रेक्षकांच्या मनात उतरवलीअसे ते एका मुलाखतीत म्हणाले होते. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीतला हसता खेळता तारा निखळला अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. या बातमीने मराठी सृष्टीचं खूप मोठं नुकसान झालं असल्याने ही पोकळी भरून येऊ शकत नाही असे म्हटले जात आहे. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाच्या बातमीने प्रेक्षकांनी तसेच मराठी सेलिब्रिटींनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. प्रदीप पटवर्धन यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.