कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला असल्याची बातमी समोर येत आहे. या अपघातातून कीर्तनकार इंदुरीकर महाराज सुखरूप बचावले असले तरी त्यांच्या ड्रायव्हरला मात्र दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे. जालन्यात असताना रात्री दहा वाजता त्यांच्या गाडीला हा अपघात घडून आला आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे बुधवारी जालना जिल्ह्यातील परतूर येथील खांडवी वाडी येथे आपल्या स्कॉर्पिओने प्रवास करत होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास समोर असलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या गाडीने धडक दिली. सुदैवाने गाडी वेगात नसल्याने अधिक नुकसान झाले नसल्याचे समोर आले. अपघात झाला असल्याची बातमी समजताच आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने मदत कार्याला सुरुवात केली.

गाडीचा वेग कमी असल्याने ट्रॅक्टरला बसलेल्या धडकेमुळे स्कॉर्पिओचे थोडे नुकसान झाले आहे यात त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे. तर सुदैवाने इंदुरीकर महाराज या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. ड्रायव्हरला थोडीशी दुखापत झाली असल्याने उपचारासाठी जवळच्याच दवाखान्यात त्यांना नेण्यात आले होते. इंदुरीकर महाराज हे कीर्तन करण्यासाठी खांडवीवाडी येथे जात होते. साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर त्यांची गाडी धडकली. दरम्यान घटनास्थळी परतूर पोलिसानी तातडीने धाव घेऊन तिथली पाहणी केली. किरकोळ जखमी झालेल्या ड्रायव्हरला खाजगी रुग्णालयात दाखल केल्यावर इंदुरीकर महाराजांना दुसऱ्या गाडीने खांडवीवाडी येथे पोहोचवण्यात आले होते. याठिकाणी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन निश्चित वेळेलाच पार पडले असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान इंदुरीकर महाराजांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी परिसरात वेगाने पसरली होती. त्यावेळी अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतलेली पाहायला मिळाली.