सयाजी शिंदे यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी नुकतीच वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासोबतच सयाजी शिंदे यांनी माझी फसवणूक केली आहे असे म्हणत तक्रारदाराने सातारा येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या शाखेतही ही तक्रार दिली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शिवाजी उर्फ सचिन बाबुराव ससाणे हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. तुळजाई फिल्म्स या त्यांच्या निर्मिती संस्थेतून ‘गिन्नाड’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यासाठी पैशांची जुळवाजुळव त्यांनी केली होती. काही स्थानिक कलाकारांना देखील त्यांनी या चित्रपटातून काम देण्याचे ठरवले होते. तर प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना देखील चित्रपटात काम करण्यासाठी विचारले होते.

त्यासाठी त्यांची ठरलेली ५ लाखांची रक्कम ससाणे यांनी सयाजी शिंदे यांना देऊ केली होती. ५ सप्टेंबर २०२२ रोजी २ लाख रुपये, २२ सप्टेंबर २०२२ रोजी २ लाख रुपये ससाणे यांनी सयाजी शिंदे यांना दिले होते. राहिलेले एक लाख रुपये टॅक्स लागू नये म्हणून सयाजी शिंदे यांनी त्यांचे सहकारी मधुकर फल्ले यांच्या अकाउंटला जमा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे ससाणे यांनी एक लाख रक्कम २४ सप्टेंबरला फल्ले यांच्या अकाउंटला जमा केली होती. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी सयाजी शिंदे चित्रपटाच्या शूटिंगला वाई मध्ये आले. त्यांच्यासाठी ससाणे यांनी हॉटेलची व्यवस्था केली. २५ आणि २६ नोव्हेंबरला शूटिंग होणार होतं मात्र २५ नोव्हेंबर रोजी माझं डबिंगचं काम आहे असे म्हणून ते तिथून निघून गेले. त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी ते सेटवर आले तेव्हा त्यांनी स्क्रिप्ट मध्ये बदल करण्यास सांगितले. ससाणे दिग्दर्शक असल्याने त्यांनी या गोष्टीला नकार दिला. तेव्हा सयाजी शिंदे यांना राग आला आणि त्यांनी स्क्रिप्ट फाडून टाकली. मी चित्रपटात काम करणार नाही तुझे पैसे तूला परत देतो असे ते म्हणाले आणि पाय आपटत नीघून गेले. त्यांनतर ससाणे यांनी सयाजी शिंदे यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र चित्रपटात काम करणार नाही असे त्यांच्याकडून उत्तर मिळाल्याने या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग रखडले गेले. या तीन दिवसात ससाणे यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले.

त्यामुळे ससाणे यांनी नाईलाजास्तव सयाजी शिंदे यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. सयाजी शिंदे यांना देऊ केलेले ५ लाख रुपये आणि दोन दिवस चित्रपटाचे शूटिंग झालेल्याचा खर्च अशी एकूण १७ लाखांची नुकसानभरपाई त्यांनी द्यावी अशी मागणी सचिन ससाणे यांनी केली आहे. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने आमच्या दोघांचीही बाजू तपासून घ्यावी अन्यथा मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही…असेही स्पष्ट शब्दांत त्यांनी ही व्यथा मांडली आहे. त्यामुळे त्याची दखल घेऊन चित्रपट महामंडळ सातारा शाखेचे महेश देशपांडे यांनी सभासदांच्या सोबत एक निवेदन एपीआय तेलतुंबडे साहेब यांना देण्यात आले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कायमच अन्यायाविरुद्ध लढत असते. सचिन ससाने यांची तक्रार दाखल करून घ्यावी म्हणून महेश देशपांडे, स्वप्निल गायकवाड निर्माते सचिन ससाने, ज्येष्ठ अभिनेते सुरेंद्र साठे, लाईन प्रोडूसर मंदार शेंडे, रवींद्र लाड, अतुल यादव, राजेंद्र गायकवाड, सूर्यकांत गायकवाड, रंजीत गाडेकर, संकेत चव्हाण असे अनेक उपस्थित होते