सोशलमीडिया हे माध्यम अनेकांसाठी अभिव्यक्तीचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. सोशलमीडियाने प्रत्येकावर गारूड केले आहे. सोशलमीडियाच्या अनेक माध्यमांपैकी एक आणि जगातील सर्वात मोठ्या सोशलमीडिया कंपनीपैकी एक असलेल्या ट्विटरचे मालक म्हणून एलॉन मस्क हे नाव लागले आहे. ४४ अब्ज डॉलर रक्कम मोजून एलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या दहांमध्ये स्थान असलेल्या एलॉन यांना आता ट्विटरचे मालक म्हणून संबोधित केले जाईल.

वैचारीक मताची मांडणी, समाजात घडणाऱ्या गोष्टींविषयीचा संदर्भासह दृष्टीकोन, यंत्रणेतील त्रुटींवर थेट बोलण्याचा मार्ग अशा अनेक अर्थांनी अन्य सोशलमीडिया माध्यमापैकी ट्विटरकडे अधिक परिपक्वपणे पाहिले जाते. त्यामुळेच ट्विटरचा मालक कोण याची उत्सुकता नेहमीच चर्चेत असते. एलॉन मस्क यांनी ट्विटरचे हेच महत्व ओळखून काही दिवसांपूर्वी ट्विटरमध्ये ९ टक्के भागिदारी विकत घेतली होती. त्यानंतर ट्विटर विकत घेण्याबाबतचा प्रस्तावही सादर केला. मस्क यांच्या प्रस्तावावर ट्विटरचे संचालक मंडळ गेल्या काही आठवड्यांपासून विचार करत होते. अखेर बोर्ड समितीने मस्क यांच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल दिला आणि आज एलॉन मस्क हे ट्विटरर या जगविख्यात सोशलमीडिया कंपनीचे शंभर टक्के मालक बनले आहेत. या कंपनीच्या शेअरधारकांनाही त्यांनी असा विश्वास दिला आहे की त्यांना रोखीने चांगला प्रीमियम दिला जाईल. त्यामुळे ट्विटरर विक्रीचा हा व्यवहार लाखो शेअरधारकांनाही फायद्याचा ठरणार आहे. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल याबाबत म्हणाले, ट्विटर हे माध्यम एका विशिष्ट हेतूने कार्यान्वित आहे.

या माध्यमावर व्यक्त होणाऱ्या प्रासंगिक मतांचा, सूचनांचा संपूर्ण जगावर परिणाम होतो. त्यामुळे ही कंपनी एका योग्य व्यक्तीला मालकी हक्काने सोपवणे ही कंपनीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. कंपनीचे नवे मालक एलॉन मस्क म्हणाले, लोकशाहीचा पाया हाच मुळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. टवीटर हे असं माध्यम आहे की जिथे मानवीमूल्यांच्या सुरक्षेसाठी, नागरिकांच्या भविष्यातील सुविधांसाठी अनेकविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते. सर्वसामान्य लोक आणि प्रशासकीय यंत्रणा यांना जोडण्याची क्षमता टवीटरमध्ये आहे. मालक म्हणून हे माध्यम भविष्यात मला अधिक सशक्त व प्रभावी बनवायचे आहे. अधिक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांनी ट्विटरला पूर्वीपेक्षा व्यापक बनवण्याचा माझा मानस आहे. त्यासाठी कंपनीसोबत काम करण्याची मला उत्सुकता आहे.