गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनपेक्षित घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून मविआ सरकार हादरवून सोडल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालत आहेत . काल दुपारपासूनच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आमदार परत येण्याऐवजी शिवसेनेत असलेले आणखी आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर शिवसेनेने या बंडखोर आमदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता याच पार्श्वभूमीवर आता काही वेळातच स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन जनतेशी संवाद साधला.

एक मोठी घोषणा करत त्यांनी ‘मी माझ्या राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवले आहे एकाने तरी समोर येऊन सांगावे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नकोय, मी या क्षणाला राजीनामा द्यायला तयार आहे.’ असे जाहीर केले आहे. ह्या सर्व घडामोडी होत असताना एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारा कलाकार मात्र मीम्सच्या माध्यमातून प्रसिद्धीस येत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. नुकताच धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर भाष्य करणारा धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटामुळे एकनाथ शिंदे चर्चेत आले होते. आनंद दिघे यांच्या पश्चात शिवसेनेची धुरा एकनाथ शिंदे यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली होती. त्यामुळे ते या चित्रपटाचा एक महत्वाचा भाग होते. धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने निभावली होती तर क्षितिश दाते याने एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. चित्रपटातील एकनाथ शिंदेच्या गेटपमध्ये क्षितिश दातेचा एक फोटो पेपरमध्ये छापून आला आहे. या फोटोवर ‘थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या’ असे मिम्स बनवण्यात आले आहेत. खरं तर चालू घडामोडींवर असे मिम्स अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात.

मात्र वृत्तपत्र माध्यमातून असे मिम्स छापून आल्याने क्षितिश दाते चांगलाच संतापला आहे. ‘हे असं छापणं चूक आहे!!…मोठी राजकीय उलाढाल चालू आहे! चेष्टेत memes येणं वेगळं आणि वर्तमानपत्रात छापणं वेगळं!’ असे म्हणून क्षितिशने या कृत्यावर नाराजी दर्शवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जी राजकीय खेळी खेळण्यात आली त्याचे सूत्रधार एकनाथ शिंदे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. मात्र असे मिम्स बनवणं ही चुकीची गोष्ट आहे असे क्षितिश स्पष्टपणे म्हणाला आहे. क्षितिश दाते हा मराठी चित्रपट मालिका अभिनेता आहे. धर्मवीर चित्रपटातील भूमिकेमुळे क्षितिश चर्चेत आला होता. या चित्रपटाअगोदर मुळशी पॅटर्न चित्रपटातील गण्याच्या भूमिकेने त्याला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. आपले फोटो अशा पद्धतीने वापरून त्यावर मिम्स बनवल्याने क्षितिश काहीसा नाराज झाला आहे. किमान वृत्त माध्यमातून तरी चेष्टा, मस्करी व्यतिरिक्त या घडामोडी गांभीर्याने हाताळल्या जाव्यात अशी एक माफक अपेक्षा त्याने केली आहे.