गेल्या काही दिवसात अनेक कलाकाराची हक्काचं घर खरेदी कराण्याची स्वप्न पूर्ण झाली आहेत. काही दिवसांपूर्वी ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील अभिनेता चेतन वडनेरे याने नाशिकमध्ये त्याच्या हक्काच्या घरात गृहप्रवेश केला. आता त्याचीच सह नायिका म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थनकर हिचही घराचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. ज्ञानदा रामतीर्थनकर हिने ठाण्यात फ्लॅट घेतला असून आज एक छोटीशी पूजा करून तिने या घरात गृहप्रवेश केलेला पाहायला मिळाला.
आईवडिलांसोबत या नवीन घराची पूजा करून स्वप्नपूर्ती झाल्याची बातमी तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यामुळे सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेने ज्ञानदा रामतीर्थनकर हिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. सख्या रे, शतदा प्रेम करावे, धुरळा, तू इथे जवळी रहा, दिल दोस्ती दुनियादारी अशा मालिका चित्रपटातून ज्ञानदाने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेनंतर ज्ञानदाला कमांडर करण सक्सेना या हिंदी वेबसिरीजमध्ये झळकण्याची संधी मिळाली. नाटकापासून सुरू झालेला प्रवास आता वेबसिरीज पर्यंत येऊन पोहोचल्याने हे नवनवीन अनुभव घेत असताना खूप छान वाटतं असं ती तिच्या या प्रवासाबद्दल सांगते.
ही सगळी माध्यमं वेगवेगळी आहेत यातून त्याचे बारकावे समजून घेण्याची संधी मिळतेय असे ती म्हणते. मुंबई लोकल हा तिचा आगामी मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात ती अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि प्रथमेश सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अभिनय क्षेत्राच्या या यशस्वी वाटचालीत घर घेण्याचं तिचं एक स्वप्न आज सत्यात उतरल्याने ज्ञानदा खूपच खुश आहे.