झी मराठीवरील शिवा ही मालिका आता एका नवीन वादळाला घेऊन येत आहे. गेले काही दिवस या मालिकेत सकारात्मक बदल घडताना दिसत होते. आशु आणि शिवा एकमेकांच्या प्रेमात पडले असताना शिवाने आशुसाठी सरप्राईज प्लॅन केले होते. शिवाने आशूला प्रपोज केलेले पाहायला मिळाले मात्र आशूने अजूनही तिला तिचे उत्तर दिले नसल्याने प्रेक्षकांमध्येही एक उत्सुकतेचे वातावरण होते. पण आता या नात्यात पुन्हा एकदा वादळ आल्याने प्रेक्षकांनी डोक्याला हात लावला आहे. दिव्याने चंदनसोबत पळून जाऊन लग्न केले पण चंदन श्रीमंत नसल्याचे सत्य दिव्याला उलगडले आहे.
त्यामुळे चंदनला सोडून ती घरी येते. त्याच्यासोबत कुठलंही नातं ठेवायचं नाही असा ती निर्णय घेते. पण आई आणि बाईआजी चंदनच्या बाजूने असल्याने दिव्याला नाईलाजाने घर सोडावं लागत आहे. “आता ही दिव्या आशूच्या घरी जाऊन राहील, शिवाला तिची दया येईल” असे भाकीत अगोदरच प्रेक्षकांनी ओळखले होते. त्यामुळे या नात्यात पुन्हा एकदा वादळ येणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. मालिकेच्या लेखकाने कथानक वळवले तसे प्रेक्षकांनाही आता या वळणाची चीड आली आहे. शिवा आशु एकत्र येतील त्यांचा संसार सुरळीत सुरू होईल अशी अपेक्षा असताना आता ही दिव्या या नात्यात दुरावा निर्माण करणार आहे. त्यामुळे या मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली आहे.
शिवा या मालिकेत शाल्व किंजवडेकर आणि पूर्वा कौशिक यांनी उत्तम भूमिका साकारलेली पाहायला मिळते त्याचमुळे या मालिकेवर प्रेक्षकांचे प्रेम आहे पण यात आता दिव्याची लुडबुड वाढल्याने प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत. दिव्याला लवकर बुद्धी येवो आणि चंदन सोबत तिचा संसार सुरळीत चालो अशी अपेक्षा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. पण आता हा ट्विस्ट किती दिवस रेंगाळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.