जरा हटके

खारीचा वाटा पुण्यातील निराधार महिलेला स्वखर्चाने बांधून देणार घर

या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ही भावना जपणारी अनेक कलाकार मंडळी मदतीसाठी पुढे सरसावलेली पाहायला मिळतात. अगदी कोरोना काळात आणि महापूर परिस्थितीत देखील कलाकारांनी एकत्र येऊन फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत निधी गोळा करून योग्य त्या व्यक्तीकडे पाठवून दिला होता. मराठी सृष्टीत अशी सामाजिक बांधिलकी जपणारी बरीचशी कलाकार मंडळी तुम्हाला पाहायला मिळतील. अशातच मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर हे देखील नेहमीच कोणाच्या ना कोणाच्यातरी मदतीला धावून आलेले पाहायला मिळतात. नुकतेच महेश टिळेकर यांनी पुण्यातील एका निराधार महिलेला डोक्यावर छप्पर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

mahesh tilekar and nitin dhimdhime
mahesh tilekar and nitin dhimdhime

पुण्याच्या अप्पर इंदिरानगर वसाहतीत ६५ वर्षांच्या रंभा पवार वास्तव्यास आहेत. लहानपणीच रंभा पवार यांचा एक डोळा निकामी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्या नवऱ्याने त्यांना सोडून दिले होते. अशातच एकाकी पडलेल्या रंभा पवार यांना आपल्या आई वडिलांनी आणि भावाने सांभाळ केला. दारोदारी जाऊन जुने कपडे घेऊन त्या आपले पोट भरायच्या. मध्यंतरी ट्रेनमध्ये चढत असतानाच त्यांचा तोल गेला आणि घसरून खाली पडल्या. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्या एका जागेवर खिळून होत्या. अपघातानंतर जवळपास तीन वर्षानंतर त्या पुन्हा चालू लागल्या. अशा परिस्थितीत त्यांच्या आई वडिलांचे आणि भावाचेही निधन झाले. राहायला घर नसल्याने आणि कुठलाही आधार नसल्याने त्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत होत्या. त्यांच्या मदतीला मराठी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर धावून आले. शिल्प डेव्हलपर नितीन धीमधीमे यांच्या मदतीने त्यांनी महेश टिळेकर यांनी स्वखर्चाने रंभा पवार यांना डोक्यावर छप्पर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

director mahesh tilekar and nitin dhimdhime
director mahesh tilekar and nitin dhimdhime

महेश टिळेकर यांच्यामुळे त्या महिलेला निश्चितच मदत होणार आहे यावरून त्यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. या मदतीबाबत महेश टिळेकर यांनी खारीचा वाटा तर नक्कीच उचलला आहे. समाजातील निराधार असहाय्य गरजू व्यक्तींसाठी जे जे शक्य होईल ते करत राहीन असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. महेश टिळेकर यांनी याअगोदर देखील असे उपक्रम राबवलेले पाहायला मिळाले होते. महेश टिळकांसोबत पुण्यातील नामांकित फॉरचून वास्तुशीलचे सर्वे सर्वा नितीन धिमधिमे आणि मकरंद पांडे हेदेखील ह्यावेळी उपस्तित होते. आनंदी परिसरात तसेच पिंपरी चिंचवड भागात अनेक बांधकामे त्यांनी केली आहेत. ह्या दोघांच्या मदतीने महेश टिळेकर हा उपक्रम राबवणार आहेत. महेश टिळेकर यांचा हवाहवाई हा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात निमिषा सजयन, विजय आंदळकर, प्राजक्ता हनमघर महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button