डीआयडी लिटिल मास्टर्स फेम वैष्णवी पाटील हिने काही दिवसांपूर्वी पुण्यातील लाल महालात चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर नृत्य केले होते. तिचा हा नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. मात्र तिच्या या लावणी नृत्य प्रकारामुळे काही जणांनी संतप्त प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी वैष्णवी पाटीलने केलेले कृत्य आक्षेपार्ह आहे असे म्हटले आहे. मराठा महासंघाने वैष्णवी पाटील ला यावरून चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळत आहे.

ज्या वास्तूत छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेले आहेत अशा वास्तूत लावणीनृत्य करून वैष्णविणे या वास्तूचे पावित्र्य दूषित केले आहे. आमचा लावणी नृत्य प्रकाराला विरोध नाही मात्र या पवित्र वास्तूचे पावित्र्य जपलं जावं अशी मराठा महासंघाची मागणी आहे. भरतनाट्यम ,कथ्थक असे कुठलेच प्रकार या ठिकाणी होऊ नयेत याला वेगवेगळे मंच आहेत तिथे जाऊन हे नृत्य सादर करावेत अशी मराठा महासंघाची मागणी आहे. लाल महालात नृत्य केल्याने वैष्णवी पाटील हिच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीच्या नृत्यप्रकारानंतर मराठा महासंघाने लाल महालात जाऊन त्याचं शुद्धीकरण करून घेतलं आहे तर जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी हार घातलेला पाहायला मिळतो आहे. वैष्णवीच्या या कृत्यावर उदयनराजे भोसले यांनी देखील आक्षेप घेतला आहे. वैष्णवी आणि तिच्यासोबत असलेल्या तिघांवर गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांनी मागणी केली होती. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर आता वैष्णवी पाटील हिने जाहीरपणे सर्वांची माफी मागितली आहे.

वैष्णवी याबाबत म्हणते की, मी पुण्यातील लाल महालात जाऊन चंद्रा गाण्यावर लावणी डान्स केला होता. असा व्हिडीओ बनवत असताना माझ्याकडून ही अनावधानाने चूक झाली आहे. मला याबाबत असे काही होईल याची मुळीच कल्पना नव्हती. मी एक डान्सर आहे शिवप्रेमींचं आणि तुम्हा सर्वांचं मन दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, मी स्वत: शिवप्रेमी आहे. माझी चूक झाली हे लक्षात येताच मी तो व्हिडिओ डिलीट केला मात्र तो इतरांकडून खूप मोठया प्रमाणात शेअर केला गेला आहे. मी चाहत्यांना विनंती करते की तो व्हिडीओ डिलिट करावा . मी माझी चूक मान्य करते आणि सर्वांची माफी मागते. माझ्याकडून पुन्हा कधीच अशी चूक होणार नाही असं मी तुम्हाला वचन देते. फेमस होण्यासाठी हा व्हिडीओ केला असा आरोप अनेकांनी केला. पण असं काहीच नाहीये. ‘ असे म्हणून वैष्णविणे एक माफी मागतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.