१३ मे २०२२ रोजी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट टिझरमधूनच उत्सुकता वाढवताना दिसला आहे त्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. आनंद दिघे यांची ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे अशीही एक ओळख आहे. या दोघांचे गुरू शिष्याचे नाते सांगणारे गुरुपौर्णिमा हे गीत नुकतेच प्रेक्षकांसमोर दाखल झाले आहे.

चित्रपटात प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारत आहे तर त्यांचा शिष्य म्हणून एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दाते याने निभावली आहे. हे दोन महत्वाचे चेहरे प्रेक्षकांसमोर दाखल झाले मात्र बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. यावरचा पडदा नुकताच हटवण्यात आला असून बाळासाहेबांची भूमिका अभिनेता मकरंद पाध्ये साकारणार असल्याचे समोर आले आहे. गुरुपौर्णिमा गाण्यातून मकरंद पाध्ये यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या गेटअप मधला लूक समोर आला आहे. या गाण्यातून गुरू शिष्याची राजकारणातील आदर्शवत जोडी कशी होती हे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना अनूभवायला मिळणार आहे. मकरंद पाध्ये हे अभिनेते, संवाद लेखक, दिग्दर्शक, निर्माते, फोटोग्राफर म्हणून या सृष्टीत कार्यरत आहेत. जे जे स्कुल ऑफ आर्टस् येथून त्यांनी कलेचे शिक्षण घेतले आहे. एकच प्याला, ट्रकभर स्वप्न अशा नाटक चित्रपटातून त्यांनी अभिनय साकारला आहे तसेच निर्माते म्हणूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

मकरंद पाध्ये हे बाळासाहेबांच्या गेटअपमध्ये अगदीच चपखल बसले आहेत. त्यामुळे त्यांची ही भूमिका प्रेक्षकाना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. आनंद दिघे हे ठाण्यात शिवसेना प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची धुरा समर्थपणे पेलली आहे. गोर गरिबांच्या मदतीस धावून जाणारे , प्रत्येक कलाकाराला तेवढाच सन्मान देणारे आनंद दिघे खऱ्या आयुष्यात नेमके कसे होते याचा उलगडा धर्मवीर चित्रपटातून होणार आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाला मान सन्मान टिकून राहण्यासाठी ह्या व्यक्तीचा मोठा वाटा आहे त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाच आहे. ह्या मराठी चित्रपटाला आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा…