अशी ही बनवाबनवी हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील आजतागायत लोकप्रिय चित्रपट बनून गेला आहे. आजही या चित्रपटातील गाणी आणि त्यातील डायलॉग प्रेक्षकांना चांगलेच परिचयाचे बनले आहेत. ‘सत्तर रुपये वारले’, ‘धनंजय माने इथेच राहतात का?…’, ‘तुम्ही आमचे कोण? काका की मामा’ या डायलॉगनी तर आजही सोशल मीडियावर अक्षरशः मिम्सचा पाऊस पाडला जातो. यातील ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ या डायलॉगचा एक भन्नाट किस्सा आहे. चित्रपट बनवताना हा डायलॉग कसा तयार झाला याचा किस्सा सांगितला आहे अभिनेते किरण माने यांनी, किरण माने यांचे एक मित्र आहेत ज्यांच्या वडिलांच्या बाबतीतच हा किस्सा घडलेला आहे. त्याबाबत आज अधिक जाणून घेऊयात…

“खरंतर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरज जाणवली नाही… पण परशा जेव्हा दार ठोठावतो, तेव्हा त्यानं पूर्ण नांव घ्यायची गरज आहे.” त्याला कुठलं आडनांव शोभेल? याचा सचिन पिळगांवकर – वसंत सबनीस वगैरे लोक व्ही. शांताराम यांच्या ऑफीसमध्ये विचार करत बसले होते… बरीच आडनांवं सुचत होती पण कुणाचं समाधान होत नव्हतं…एवढ्यात व्ही. शांताराम दाराकडे पाहून म्हणाले, “या या माने.. काय काम काढलंत?” व्ही. शांताराम यांचे सी.ए. किसन माने आले होते. त्यांना काही कागदपत्रांवर व्ही. शांताराम यांच्या सह्या हव्या होत्या. ‘त्या’ हाकेनं चर्चेच्या वेळी असं टायमिंग साधलं होतं की त्यांच्या सह्या होईस्तोवर सचिनजी आणि वसंत सबनीसांनी ठरवून टाकलं की त्या पात्राचं आडनाव ‘माने’ हेच असेल !!!… मिटींग संपता-संपता व्ही. शांताराम यांनी किसन मानेंना पुन्हा त्यांच्या केबिन मध्ये बोलावून घेतले आणि हसत-हसत विचारलं की “माने तुमचं आडनाव आमच्या सिनेमातल्या ‘धनंजय’ या पात्राला वापरायला तुमची काही हरकत नाही ना?” केबिनमध्ये हास्यकल्लोळ उसळला..

आणि संपूर्ण मराठी मुलखात हास्यकल्लोळ उसळवणारा तो ‘अजरामर’ डायलाॅग जन्माला आला – “धनंजय माने इथेच रहातात का?” किसन माने यांचे चिरंजीव विक्रम माने माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये आहेत… त्यांनी एक दिवस इनबाॅक्स मध्ये ठकठक केलं “किरण माने इथंच रहातात का?” …आणि मला ही घटना सांगीतली. लै भारी वाटलं… म्हन्लं, मी हा किस्सा फेसबुकवरून दोस्तलोकांना सांगू का? तुमची काही हरकत नाही ना? नाही तर पुन्हा म्हणाल, “हा शुद्ध हलकटपणा आहे माने !”- किरण माने. अभिनेता किरण माने ह्यांनी हि पोस्ट शेअर केल्यानंतर अनेक कलाकारांनी त्या चित्रपटाच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल अभिनेते किरण माने ह्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या. अनेकांनी त्या चित्रपटातील वेग्लेव्हीले डायलॉग आणि त्यातील गमतीजमती आजही तितक्याच पाहायला आवडतात असे सांगून अजून किमान १०० वर्ष ह्या चित्रपटाची जादू अशीच राहील असं भाकीत देखील केलेलं पाहायला मिळतंय.