झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेचा काल रविवारी दोन तासांचा विशेष भाग दाखवण्यात आला. या महाएपिसोडने मालिकेची सांगता झाली. मात्र मालिका निरोप घेत असताना अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवले हे कुठल्याही प्रेक्षकाला न उमजणारे कोडे बनून गेले आहे. ज्यावेळेस ही मालिका सुरू झाली त्यावेळेस वाई तालुक्यातील घटनेशी याचा संबंध आहे असे बोलले जात होते. वास्तवात या घटनेशी निगडित असलेला डॉ संतोष पोळ हा पोलिसांच्या अटकेत आहे आणि त्याने केलेल्या गुन्ह्यांवर कोर्टात केस देखील चालू आहे.

श्वेता शिंदे ने या मालिकेअगोदर लागीर झालं जी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. देवमाणूस ही मालिका देखील सुरू आजीच्या डायलॉगबाजी मुळे आणि बज्या, नाम्या, टोण्याच्या विनोदामुळे खूपच गाजली. मालिका गेल्या वर्षी १६ ऑगस्टला झी वाहिनीवर दाखल झाली, बरोबर एक वर्षाने ही मालिका संपली देखील . मात्र मालिकेचा शेवट प्रेक्षकांचा हिरमोड करणारा ठरला. जो डॉक्टर इतक्या जणींना आपल्या जाळ्यात ओढतो, इतक्या जणांची फसवणूक करतो, गावकऱ्यांना अंधारात ठेवून स्वतःला देवमाणूस म्हणवतो त्या डॉक्टरचा शेवटही अगदी तसाच होणे अपेक्षित होते. अशी चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. मालिकेच्या शेवटी डॉक्टरला अटक होणे अपेक्षित होत, वाईट कामात मदत करणारी डिंपल पोलिसांच्या तावडीत सापडली नाही, बज्याचा एका बुक्कीतच म्हणून या सर्व वाईट कृत्याचा बदला घेणारा डायलॉग फक्त डायलॉगच बनून गेला, नाम्याचे लग्न स्वप्नच बनून राहिले..प्रत्यक्षात या सर्वांचा विचार मालिकेत केला गेला नसल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे.

डॉक्टर शेवटी जिवंत दाखवला तो त्या दवाखान्यात पोहोचलाच कसा? चंदा कशी मेली? हे प्रश्न देखील अनुत्तरित ठरले. म्हणजे जर डॉक्टर अजूनही जिवंत आहे त्याअर्थी ही मालिका खरी संपली नसावी असा तर्क सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून लावण्यात येत आहे. त्यामुळे देवमाणूस या मालिकेचा सिकवल येणार अशी चर्चा जोर धरताना दिसत आहे. देवमाणूस मालिका मधल्या काळात लांबवत गेल्याने प्रेक्षकही थोडे नाराज होते. एकापाठोपाठ एक अशा कलाकारांच्या नव्या एंट्रीने प्रेक्षक मालिकेपासून काहीसे दुरावले होते. याच हेतूने ही मालिका अर्ध्यावरच संपवली असा तर्क आता लावलेला पाहायला मिळत आहे. भविष्यात या मालिकेचा सिकवल आल्यास प्रेक्षक त्या मालिकेला स्वीकारतील कि नाही ह्यात शंका आहे ….तूर्तास ह्या मालिकेजागी एक चांगली मालिका पाहायला मिळेल अशी आशा बाळगू .