देवमाणूस मालिका निर्णायक वळणावर येऊन ठेपली अशा चर्चा जोर धरतानाच मालिकेत नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून डिंपल आणि डॉक्टरच्या लग्नात दिव्या सिंगने घातलेला गोंधळ देवीसिंगला आपल्या जाळ्यात पुरता अडकवणार अशी अपेक्षा असतानाच गावकरी डॉक्टरला सोडून देण्याची मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे आख्खं गावच डॉक्टरच्या बाजूने झालेले पाहायला मिळत आहे त्याला पोलिसांच्या तावडीतून सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. डॉक्टरची केस आता कोर्टापर्यंत गेली आहे.

डॉक्टरची बाजू लढण्यासाठी एक पुरुष वकील नेमण्यात आला आहे मात्र मालिकेत एक ट्विस्ट आल्याने डॉक्टर त्या वकिलाला आपली केस लढण्यास नकार देत आहे. हा ट्विस्ट आला आहे मालिकेत लवकरच एन्ट्री घेणाऱ्या “आर्या मॅडम” मुळे. आर्या मॅडम सरकारी वकील असल्याचे तुर्तास तरी दिसून येत आहे ही आर्या मॅडम देवीसिंग विरोधात केस लढणार असल्याने या आर्याच्या सुंदरतेसमोर हार जरी पत्करावी लागली तरी चालेल असे डॉक्टर मनाशी ठरवताना दिसत आहे. आर्या हे पात्र डॉक्टरच्या जाळ्यात अडकणार की आणखी वेगळे काही पाहायला मिळणार याबाबत पुढील काही भागात लवकरच स्पष्ट होईल परंतु मालिकेचा टीआरपी वाढल्याने मालिका अजून तरी बंद होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. तुर्तास मालिकेत आर्याची भूमिका कोण साकारत आहे त्याबद्दल जाणून घेऊयात… देवमाणूस मालिकेत सरकारी वकील आर्या मॅडमचे पात्र साकारणारी अभिनेत्री आहे “सोनाली पाटील”. सोनाली पाटील हिला तुम्ही याअगोदर टिकटॉकवर पाहिलेच असेल.टिक टॉक वरील तिचे व्हिडीओज प्रचंड गाजल्याने तिला मराठी मालिकेत काम करायची संधी मिळाली होती. ५ मे रोजी लातूर येथे सोनालीचा जन्म झाला.

आपले शिक्षण तिने ताराराणी विद्यापीठ, उशाराजे हायस्कूलमधून केले. तर कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे एमए आणि बीएडची पदवी देखील तिने प्राप्त केली आहे. त्या पेशाने शिक्षिका आहेत. त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम देखील केले आहे. सोनालीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती तिची आवड तिने टिक टॉक वरील व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आणली होती. तिच्या व्हीडोजला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. याचमुळे तिला मराठी मालिका साकारण्याची संधी मिळाली होती. स्टार प्रवाहवरील “वैजू नं 1” मालिकेत तिने वैजूची भूमिका साकारली होती. याअगोदर घाडगे अँड सून मालिकेत प्रियांकाचे पात्र तसेच जुळता जुळता जुळतंय की मालिकेतून तिने रेखाचे पात्र साकारले होते. वैजू नं 1 ही तिची मध्यवर्ती भूमिका असलेली पहिलीच टीव्ही मालिका होती. मध्यवर्ती भूमिका साकारण्याची नामी संधी तिला मिळाली असली तरी ही मालिका अर्ध्यावरच बंद करण्यात आली होती. परंतु लवकरच सोनाली पाटील देवमाणूस मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती आर्याची दमदार भूमिका साकारताना दिसणार आहे. आता आर्या डॉक्टरला जाळ्यात अडकवणार की तीच देवीसिंगच्या जाळ्यात ओढली जाणार हे पाहणे आता रंजक होणार आहे. येत्या भागातच तिच्या भूमिकेबाबत स्पष्ट होईलच…आर्या मॅडमच्या या भूमिकेसाठी सोनाली पाटील हिला मनःपूर्वक शुभेच्छा…