देवमाणूस मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत डिंपल आणि डॉ अजितच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. एकीकडे विवाहसोहळ्याचा आनंद मात्र दुसरीकडे दिव्या सिंगला डॉ अजितकुमार विरोधात सापडलेले पुरावे या सर्व गोष्टींमुळे मालिका एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली असल्याचे दिसून येत आहे. मालिकेत लवकरच हळदीची जोरदार तयारी सुरू असताना दिव्या सिंगला डॉक्टर बद्दल बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे.

डॉक्टरच देवीसिंग आहे अशी खात्री आता दिव्याला पटली असल्याने आता ती पुढे कोणते पाऊल उचलणार याकडे मालिकेच्या प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. अजित कुमारची दिशाभूल करून दिव्या त्याच्या विरोधात असलेले सर्व पुरावे गोळा करत आहे. मात्र या तपासात दिव्याच्या बाबतीत डॉक्टरला संशय आला असल्याने तोही सतर्क असलेला दिसत आहे. अशातच दिव्या डॉक्टरच्या तावडीत सापडणार की आणखी काही वेगळे घडणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे. मालिकेत नुकतेच डिंपल आणि डॉ अजितच्या लग्नाचे चित्रीकरण पार पडले आहे. या सोहळ्याचे फोटो तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. लग्न सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून लग्नात डिंपलने लाल रंगाचा शालू आणि डॉ अजितने शेरवानी परिधान केलेला पाहायला मिळत आहे. टोण्या, डिंपलची आई , आत्या हे सर्वच जण मोठ्या थाटात डिंपल आणि अजितचे लग्न लावताना दिसत आहेत. मालिकेतला हा विवाहसोहळा प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे मात्र त्यांच्या लग्नात दिव्या सिंग मुळे काही विघ्न येणार असल्याने रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

कारण रिअल लाईफ मधला देवीसिंग डिंपलशी लग्न करण्याचे केवळ आश्वासन देत असतो त्यामुळे मालिकेत दिव्या सिंग डॉक्टरला अटक करणार आहे. डॉक्टरच्या अटकेनंतर देवमाणूस मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित झाले आहे. साताऱ्यात घडलेली सत्य घटनेवर आधारित देवमाणूस ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. डॉक्टरला कधी अटक होईल याचीच उत्सुकता प्रेक्षकांमध्ये जास्त पाहायला मिळाली. आता लग्नातच देवीसिंगला अटक होईल आणि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल हे स्पष्ट झाले आहे. मालिका निरोप घेणार म्हटल्यावर त्या जागी कुठली नवी मालिका येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. या नव्या मालिकेबाबत येत्या काळात लवकरच उलगडा होईल …