देवमाणूस या मालिकेच्या पहिल्या सिजनला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता . या मालिकेत संजय हे पात्र दाखवले होते. मंजुळाला मदत करणारा संजू डॉक्टरच्या कटकारस्थानाला जाणून होता या मुळे डॉक्टरांनी संजूचा काटा काढला होता. ही भूमिका अभिनेता सागर कोरडे याने साकारली होती. देवमाणूस या मालिकेव्यतिरिक्त सागरने झी मराठी वरील घेतला वसा टाकू नको या मालिकेतून विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या.

सागर कोरडे हा थेटर आर्टिस्ट म्हणून ओळखला जातो. रंगभूमीवर विविध नाटकांतून त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यातूनच म्युजिक व्हिडीओ सॉंग तसेच मालिकांमधून त्याला झळकण्याची संधी मिळाली. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेतून सागरला बाळू मामांचा सेवेकरी बापू शिनगारे ही भूमिका मिळाली आणि त्याने ती भूमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवली. नुकताच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी प्रियतमा हा म्युजिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या गाण्यात सागरने मुख्य भूमिका बजावली आहे. सागरच्या पावलावर पाऊल टाकत त्याची लेक ‘स्वरा सागर कोरडे’ ही देखील अभिनय क्षेत्रात दाखल झाली आहे. शशांक केतकर अभिनित ‘मुरांबा’ ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर दाखल झाली आहे. या मालिकेत शशांकने अक्षय मुकादम हे पात्र साकारले आहे.

तर या मालिकेतून स्वराने शशांकच्या भाचीचे म्हणजेच नटखट ताराचे पात्र साकारले आहे. मामा भाचीची मजामस्ती या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. स्वराला लहानपणापासूनच अभिनयाची आवड आहे. तिच्या अभिनयाचे अनेक रील व्हिडिओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना अभिनयाची संधी मिळाली आहे. अशातच स्वराने मुरांबा या मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिचे ताराच्या भूमिकेसाठी सिलेक्शन झाले. स्वराची ही बालभूमिकेतली पहिलीच टीव्ही मालिका आहे त्यामुळे या मालिकेबाबत आणि ताराच्या भूमिकेबाबत ती खूपच उत्सुक असलेली पाहायला मिळत आहे. या पहिल्यावहिल्या मालिकेसाठी स्वरा कोरडे हिला खूप खूप अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा…