
देवमाणूस या मालिकेच्या यशानंतर श्वेता शिंदेने देवमाणूस २ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. मालिकेचा पहिलाच महाएपिसोड टीआरपीचा उच्चांक गाठणारा ठरला होता. त्यावरून ही मालिका झी वाहिनीचा घटलेला टीआरपी वाढवण्यास सज्ज झालेली पाहायला मिळते आहे. सध्या नटवरलालच्या भूमिकेत असलेला देवीसिंग हळूहळू आपल्या मूळ रुपात आलेला पाहायला मिळतो आहे. कारण नटवरने सलोनीला संपवले आहे आणि तो तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत या कारस्थानातून सुखरूप निसटणार देखील आहे.

मालिकेचा आजचा भाग प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. कारण आजच्या भागात एका खास पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. ‘आला एकला गेला एकला….’ हे मालिकेचं शीर्षक गीत आहे. हे शीर्षक गीत महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना खूपच भावलेलं आहे. याच गीताचे गायक ‘अवधूत गांधी ‘ आणि संगीतकार ‘रोहित नागभिडे’ या मालिकेच्या आजच्या भागात हजेरी लावणार आहेत. आजच्या भागात ते गावकऱ्यांसमोर कीर्तन सादर करताना दिसणार आहेत यासोबतच मालिकेच्या शीर्षक गीताची लाईव्ह गातानाची एक झलक देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या शीर्षक गीताच्या चाहत्यांसाठी हा एपिसोड महत्वाचा ठरणार आहे. अवधूत गांधी यांनी मराठी चित्रपटातील गाणी देखील गायली आहेत. फत्तेशीकस्त या चित्रपटात अवधूत गांधी यांनी गायलेलं ‘हेचि येळ देवा नका…’ हे गाणं देखील प्रचंड लोकप्रिय झालं आहे. अवधूत गांधी हे श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी भजन , कीर्तन गायक म्हणून ओळखले जातात.

गेल्या वर्षी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार ” वारकरी कीर्तनातील संगीत क्षेत्रातील युवागायक अवधूत गांधी यांना जाहीर करण्यात आला होता. सांप्रदायिक भजनाची गांधी घराण्यात परंपरा असून अवधूत गांधी यांनी वारकरी भजन , पखवाज वादन ,लोकसंगीत गायन , पार्श्वगायन अशी चौफेर मुशाफिरी केली आहे. फर्जंद ,फत्तेशिकस्त सारख्या चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले आहे. मालिका सुरू होताच देवमाणूस या मालिकेचे शोर्षक गीत प्रेक्षकांच्या अगदी ओठावर येतं ही या गाण्याची खरी खासियत म्हणावी लागेल. आजच्या भागातून अवधूत गांधी यांच्या गायनाची झलक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे त्यामुळे हा भाग पाहण्यासाठी मालिकेचे प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील याची खात्री आहे.