गेल्या काही वर्षांपासून मराठी मालिका सृष्टीतील कलाकारांना सुगीचे दिवस आले आहेत असे दिसून येते. कारण याच मालिकांमधून उत्तम मानधन मिळवून ही कलाकार मंडळी आता अनेक सुखवस्तू घेताना पाहायला मिळत आहेत. मुंबईत घर घेणे असो वा १५ ते २० लाखांची गाडी घेणे या गोष्टी कलाकारांना आता सहज घेता येणे शक्य झाले आहे. देवमाणूस २ या मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड याने देखील नुकतीच एक गाडी खरेदी केली आहे. ‘आता पुढचा प्रवास हिच्यासोबत’ असे म्हणत किरणने गाडी खरेदी केल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.

लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला किरण गायकवाड गेल्या काही वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत झळकतो आहे. अर्थात एखादी भूमिका वगळता बहुतेकदा त्याने खलनायकाच्या भूमिका रंगवल्या आहेत. मात्र या मालिकांमधून स्थिरस्थावर होत असताना आता त्याने आपल्या आयुष्यातील पहिली वहिली Kia carens ही चार चाकी गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत साधारण १४ ते १७ लाख इतकी आहे. किरण गायकवाड हा कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाट्यस्पर्धा आणि एकांकिकामधून पुढे आला आहे. लागीरं झालं जी या मालिकेतून किरणने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते यात त्याने भैय्यासाहेबांची भूमिका गाजवली होती. मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या किरणने पुढे जाऊन टोटल हुबलाक या मालिकेत साधासुधा आणि आर्थिक परिस्थितीपुढे हतबल झालेला नायक रंगवला होता. देवमाणूस या मालिकेने त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. रिमझिम या गाण्यातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

श्वेता शिंदेने तिच्या लाडक्या कलाकाराला म्हणजेच किरणला पुन्हा एकदा अभिनयाची संधी दिली. त्याने साकारलेला डॉ अजितकुमार देव प्रेक्षकांच्या टिकेला पात्र ठरला हीच त्याच्या सजग अभिनयाची खरी पावती ठरली. या मालिकेने टीआरपीच्या रेसमध्ये देखील आपले स्थान पटकावले होते. त्यामुळे या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आणला. साधारण चार मालिका करणारा किरण देवमाणूस २ मालिकेसाठी महिन्याला लाखोंचे मानधन मिळवत आहे. त्यामुळे आता हाताशी गाडी असावी अशी प्रत्येकाचीच ईच्छा असते हीच ईच्छा त्याने गाडी खरेदी करून पूर्ण केलेली पाहायला मिळत आहे. मात्र देवमाणूस २ च्या भागाला पाहिजे तितकं यश मिळालं नाही शिवाय मालिका भरकलेली देखील पाहायला मिळते सत्य घटनेवर आधारित मालिका आता हवीतशी फिरवली जातेय ह्यामुळे प्रेक्षक तिव्र नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत.