देवमाणूस २ या मालिकेत डॉ अजितकुमार देव सध्या नटवरलाल असल्याचे गावकऱ्यांना भासवत आहे मात्र गावातील सर्वच जण तो डॉक्टरच आहे असे विश्वासाने म्हणत आहेत. डॉ अजितकुमार सलोनीला संपवून आपल्या मूळ रुपात आलेला दिसला. त्यामुळे त्याची पुढची खेळी काय असणार याची उत्सुकता पुढील भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणारच आहे. मालिकेत गावातील वेगवेगळ्या कामासाठी सरपंचाने काँट्रॅक्टरला बोलावले आहे. काँट्रॅक्टर गाडीतून खाली उतरतो त्याच क्षणी त्याची बायको देखील त्याच्या पाठोपाठ गाडीतून खाली उतरते.

मात्र तू गाडीत बस असे म्हणत तो काँट्रॅक्टर त्याच्या बायकोला ओरडतो. त्याचवेळी डॉक्टरची नजर या नव्याने एन्ट्री घेणाऱ्या महिलेवर पडते. आणि आपल्याला सावज मिळाले या अविर्भावात येऊन डॉक्टर आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो. त्यामुळे पुढच्या भागात डॉक्टर काँट्रॅक्टरच्या बायकोला आपल्या जाळ्यात कसे ओढतो हे पाहायला मिळणार आहे. मालिकेत नव्याने एन्ट्री होत असलेल्या अभिनेत्रीला बऱ्याच प्रेक्षकांनी ओळखले असावे. लागिरं झालं जी या मालिकेतील सुमन काकी म्हणजेच अभिनेत्री शिवानी घाटगे या देवमाणूस२ मालिकेतून लवकरच एन्ट्री घेत आहेत. शिवानी घाटगे यांचा देवमाणूस२ या मालिकेसाठी नवा लूक समोर आला आहे एका नव्या आणि तितक्याच ग्लॅमरस भूमिकेत शिवानी घाटगे खूपच स्टायलिश वाटत आहेत. शिवाय मालिकेच्या चित्रीकरण स्थळाचे काही फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शिवानी घाटगे या मूळच्या इस्लामपूरच्या. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अभिनयाचे वेध त्यांना लागले. इथूनच विविध नाट्यस्पर्धांमधून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले.

लागीरं झालं जी या मालिकेतून त्यांनी सुमन काकींची भूमिका निभावली होती. शीतलच्या मनातल्या भावना ती सुमनकाकींकडे व्यक्त करत होती त्यामुळे प्रेक्षकांना देखील सुमनकाकी खूपच भावल्या होत्या. पाळशीची पी टी या चित्रपटातून शिवानी घाटगे यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. हा त्यांचा अभिनित केलेला पहिला चित्रपट ठरला. देवमाणूस या मालिकेच्या पहील्या सिजनच्या प्रोमोमध्ये शिवानी घाटगे झळकल्या होत्या मात्र मालिकेतून त्यांच्या वाट्याला कुठलीच भूमिका आली नव्हती. त्यानंतर देवमाणूस२ मालिकेतून त्यांना आता महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. ही भूमिका देखील त्या सहजसुंदर अभिनयाने गाजवतील असा विश्वास आहे. झी मराठी वरील मालिकेत पुनःपदार्पणासाठी शिवानी घाटगे यांचे अभिनंदन आणि नव्या भूमिकेसाठी शुभेच्छा…