
देवमाणूस २ ही मालिका आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. अती व्यसनामुळे बाबुदादाची तब्येत खालावली आहे. आपल्या डोळ्यादेखत डिंपलचे लग्न व्हावे अशी त्याची अखेरची ईच्छा आहे. त्याची ही ईच्छा पूर्ण करण्यासाठी मालिकेत मंगल, डिंपलचा आटापिटा चालू आहे. त्यासाठी डिंपलने डॉक्टरांसोबत लग्न व्हावे म्हणून उपोषण देखील सुरू केले आहे. अर्थात यातून तिला फायदाच होणार असल्याने ती डॉक्टरसोबत लग्न करण्याच्या प्रयत्नात आहे. डिंपल उपोषणाला बसली असल्याने बज्या नाम्या आणि गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे डिंपल सोबत लग्न करायला डॉक्टरांनी होकार द्यावा अशी ते मागणी करत आहेत.

गावकऱ्यांच्या विनंतीपुढे डॉक्टरला आता डिंपलसोबत लग्न करावेच लागणार आहे. परंतु या लग्नाला सोनालीचा मात्र पुरता विरोध आहे. डॉक्टरने आपल्याला जाळ्यात ओढून फसवलं आहे पण आता तो डिंपलसोबत लग्न करणार असल्याने ती विरोध करत आहे. त्यामुळे डॉक्टर सोनूचा काटा काढणार का हे येत्या भागात स्पष्ट होईल. तूर्तास मालिकेत डिंपल आणि डॉक्टरच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. मालिकेच्या सेटवर नुकतेच हळदीच्या सोहळ्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यासोबतच देवमाणूस २ या मालिकेने १०० भागांचा टप्पा पार केला आहे त्यामुळे मालिकेच्या सेटवर कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. डिंपल आणि डॉक्टरच्या हळदी सोहळ्याचे काही खास फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र मालिकेत डॉक्टर आणि डिंपलचे लग्न होणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण देवमाणूस या मालिकेत डिंपल आणि डॉक्टरच्या लग्नाच्या दिवशी दिव्यासिंग डॉक्टरला अटक करताना दिसली होती त्यावेळी या दोघांचे लग्न व्हायचे थांबले होते.

त्यामुळे आताही असेच काही घडणार का त्यांच्या लग्नात विघ्न येणार का अशी पुसटशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. देवमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनि खूप चांगला प्रतिसाद दिला होता. टीआरपीच्या स्पर्धेत या मालिकेने टॉप ५ मध्ये स्थान मिळवले होते मात्र या मालिकेच्या तुलनेने देवमाणूस २ या मालिकेला अल्पसा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे टॉप १० मध्ये देखील या मालिकेला स्थान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. मालिकेतील सर्व पात्र आहे तशीच असली तरी डॉक्टरच्या कुरघोड्या आणि कटकारस्थानं लवकरात लवकर गावकऱ्यांसमोर उघड व्हावित अशी प्रेक्षकांची ईच्छा आहे. पाठ फिरवलेले प्रेक्षक मालिकेतील ह्या नव्या वळणामुळे आतातरी हि मालिका पाहणार का हे येणाऱ्या टीआरपी लिस्टमध्ये समजूनच येईल.