झी मराठी वाहिनीवर देवमाणूस या मालिकेचा पुढचा भाग असलेली देवमाणूस२ ही मालिका काही दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली आहे. मालिकेतील दिलखुलास पात्र आणि तितकंच उठावदार असलेलं शीर्षक गीत हे जसे होते तसेच ठेवल्याने व यात बदल केला नसल्याने मालिकेच्या टीमचे विशेष कौतुक करावेसे वाटते. मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे असे समजून त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेश बदलून कातळवाडीत कसा येतो आणि तो इतके दिवस कुठे गायब असतो याचा उलगडा लवकरच मालिकेतून होत आहे.

मात्र अजितकुमार देव राजस्थानमध्ये जाऊन आणखी कोणती कटकारस्थान रचत असतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. राजस्थान येथील जैसलमेर या ठिकाणी कथानकाला अनुसरून मालिकेचे काही शूटिंग करण्यात आले आहे. अजितकुमार सध्या वेश बदलून नटवर सिंगच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. नटवरसिंग सोबत असलेली सलोनी नेमकी कोण आहे आणि ती त्याची साथ कशी देते याचाही उलगडा मालिकेतून लवकरच होणार आहे. तूर्तास या सलोनीची भूमिका साकारणाऱ्या नायिकेबद्दल माहीत नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊयात… डॉ अजितकुमार देवला म्हणजेच नटवरसिंगला साथ देणारी सलोनीची भूमिका निभावली आहे अभिनेत्री “प्रिया गौतम” हिने. प्रिया गौतम ही मूळची जयपूर, राजस्थानची. मॉडेलिंग आणि अभिनेत्री क्षेत्रात प्रिया आपली स्वतःची ओळख बनवू पाहत आहे. देवमाणूस२ ही तिने अभिनित केलेली पहिली मराठी मालिका आहे. या मालिकेअगोदर प्रियाने सपना मॅट च्या जाहीरातीमध्ये आणि साड्यांच्या ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग म्हणून काम केलं आहे. सोनी टीव्हीवरील मेरे साई श्रद्धा और सबुरी या हिंदी मालिकेत तिने अभिनय साकारला होता. देवमाणूस२ या मालिकेत ती सलोनीची भूमिका साकारत आहे. सलोनी नक्की कोण आहे आणि ती डॉक्टरला का मदत करते याचा उलगडा अजून झालेला नाही मात्र डिंपलने डॉक्टरला या बदललेल्या वेशात देखील ओळखले आहे.

डॉक्टरला जिवंत पाहून डिंपल भांबावून गेली असली तरी पुढे जाऊन ती देखील डॉक्टरच्या कटात कशी सामील होते हे पाहावे लागेल. कारण डॉक्टरला त्याच्या वाईट कामात मदत करत असताना डिंपलला त्याबदल्यात पैसे मिळत होते. आता डॉक्टरच नसल्याने तिच्या कुटुंबाला आर्थिक चणचण भासू लागली आहे. विशेष म्हणजे डिंपलला हिरोईन व्हायचं होतं ते स्वप्न देखील अधुरच राहिले आहे त्यामुळे ती डॉक्टरला त्याच्या वाईट कृत्यात नक्कीच साथ देणार हे निश्चित आहे. येत्या काही दिवसातच कातळवाडीत पुन्हा डॉक्टर बनून हा देवीसिंग अनेकांना गंडा घालणार आहे त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अर्थात देवमाणूस या मालिकेचा शेवट अर्धवट करण्यात आला होता त्यामुळे ह्या दुसऱ्या सिजनमध्ये किमान देवीसिंगला त्याच्या कारस्थानांची शिक्षा मिळायला हवी अशी अपेक्षा आहे मात्र त्याचं खरं रूप ग्रामस्थांसमोर कधी येईल याची उत्सुकता अधिक आहे. अभिनेत्री प्रिया गौतम हिला सलोनीच्या भूमिकेसाठी आणि पहिल्या वहिल्या मराठी मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…