
देवमाणूस २ या मालिकेत अभिनेत्री शिवानी घाटगे यांची एन्ट्री झाली आहे. गावातील कामं निकाली लावण्यासाठी काँट्रॅक्टरला बोलावलेलं असतं या काँट्रॅक्टरच्या पत्नीची भूमिका शिवानी घाटगे यांनी बजावली आहे. लागीरं झालं जी या मालिकेनंतर शिवानी घाटगे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. डॉक्टरच्या जाळ्यात त्या हळूहळू अडकताना पाहायला मिळत आहेत. मात्र डॉक्टरांच्या कारस्थानावर नजर ठेवून असलेल्या पिंकीची सध्या जोरदार चर्चा आहे. डॉक्टरांवर नजर ठेवता ठेवता ही पिंकी आपला जीव धोक्यात घालण्याचे धाडस दाखवत आहे.

त्यामुळे पिंकी आपल्यावर लक्ष्य ठेऊन आहे असे जर डॉक्टरला समजले तर तो तिला नक्कीच संपवणार अशी भीती सध्या प्रेक्षकांना आहे. या दिलखुलास पिंकीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री “ऋतुजा धुमाळ कनोजीया” हिने. ऋतुजा धुमाळ हिने देवमाणूस २ या मालिकेत पिंकीची भूमिका साकारली आहे. ही पिंकी डिंपलच्या पार्लरमध्ये काम करत असते. डॉक्टरचा दवाखाना ज्या खोलीत असतो त्याच खोलीत डिंपल पार्लर चालवत असते. घरखर्चाला हातभार लागावा म्हणून ही डिंपल काहीतरी धडपड करत असते आता डॉक्टर पुन्हा परतल्यामुळे ती खोली डॉक्टरला परत द्यावी असा विचार मंगल ताई करत असतात. मात्र काँट्रॅक्टरची पत्नी आणि डॉक्टर यांच्यात काहीतरी सुरू असल्याचे डिंपलला समजते आणि ती पिंकीला डॉक्टरच्या हालचालींवर नजर ठेवायला सांगते. मालिकेत पिंकी थोडीशी अल्लड आणि विनोदी स्वभावाची आहे ही भूमिका ऋतुजा धुमाळ हिने आपल्या अभिनयाने सुरेख बजावली आहे. ऋतुजा धुमाळ ही मूळची पुण्याची. पुण्यातच तिचे संपूर्ण शिक्षण झाले असून कॉलेजमध्ये असताना तिने नाटकांतून काम केलं आहे.

थिएटर आर्टिस्ट म्हणून ऋतुजा धुमाळने नाटकातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. देवमाणूस २ या मालिकेमुळे प्रथमच तिला छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी रोहन कनोजीया सोबत तिचे लग्न झाले. रोहन कनोजीया हा मूळचा पुण्याचा असून येथेच त्याचे संपूर्ण शिक्षण झाले आहे शिवाय तो उत्कृष्ट शेफ देखील आहे. लंडन मधील हॉलिडे इन केंसिंग्टन फोरम येथे तो गेल्या १० वर्षाहून अधिक काळापासून असिस्टंट शेफ म्हणून कार्यरत आहे. लग्नानंतर ऋतुजा तिच्या नावऱ्यासोबत काही काळ परदेशात राहिली होती. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात येण्याचा विचार केला. देवमाणूस २ या मालिकेमुळे झी मराठीचा मोठा प्लॅटफॉर्म तिला मिळाला आहे. इथूनच आपल्या अभिनयाला वाव मिळणार आहे आणि आपल्याला एक ओळख मिळणार आहे असा तिला विश्वास आहे. आपलं स्वप्न पूर्ण होतंय हे पाहून ऋतुजाचा आनंद आता गगनात मावेनासा झालाय. या मालिकेसाठी आणि पिंकीच्या भूमिकेसाठी ऋतुजा धुमाळ कनोजीया हिचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा….