गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रदीप मेहराचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पाठीवर बॅग घेऊन १९ वर्षांचा हा प्रदीप नोएडाच्या रस्त्यावर रात्री १२ वाजता का धावतोय? हे जाणून घेण्यासाठी फिल्ममेकर विनोद कापरी यांनी हा व्हिडीओ बनवला होता. प्रदीप १९ वर्षांचा आहे आणि तो मॅकडोनल्ड सेक्टर १६ मध्ये कामाला आहे. कामावरून घरी जाण्याचे अंतर दहा किलोमीटर आहे आर्मीमध्ये भरती होण्याची ईच्छा असल्याने आणि सकाळी उठून पुन्हा कामाला जायचं असल्याने रोजच तो अशा प्रकारे धावण्याचा सराव करतो. गेल्या दोन वर्षांपासून प्रदीपची आई टीबीच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे तर त्याला एक मोठा भाऊ देखील आहे.

धावत घरी जाऊन त्याला स्वतःसाठी आणि कामावरून येणाऱ्या मोठ्या भावासाठी स्वयंपाक बनवायचा असतो त्यामुळे त्याने फिल्ममेकर विनोद कापरी यांनी देऊ केलेली जेवणाची ऑफर या व्हिडिओमध्ये नाकारलेली पाहायला मिळाली. प्रदीपचा हा संघर्ष सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो रातोरात लोकांकडून सहानुभूती आणि प्रशंसा मिळवू लागला. प्रदीपच्या या संघर्षाची दखल नुकतीच घेतलेली पाहायला मिळत आहे. मंगळवारी प्रदीप आणि त्याच्या भावाला गौतमबुद्ध नगर येथील जिल्हाधिकारी सुहास एलवाई यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. यावेळी सुहास एलवाई यांनी प्रदीपशी संवाद साधला. मी बारावी पास आहे आणि मला आर्मीमध्ये भरती व्हायचंय त्यासाठी मी खूप मेहनत घेतोय. माझा व्हिडीओ व्हायरल झाला तसा मला अनेक संस्थेकडून कॉलेजमधून मोफत शिक्षणाची ऑफर येऊ लागली आहे असे प्रदीप एलवाई यांच्याशी बोलताना म्हणतो. याबाबत डीएम कडून प्रदीपला चांगले शिक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे आणि त्याने कोणत्या क्षेत्रात करिअर करावे याचाही सल्ला देण्यात येईल असे म्हटले आहे. यावेळी डीएमकडून प्रदीपच्या आईच्या तब्येतीबाबत चौकशी करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून टीबी आजाराशी झुंज देत असलेल्या प्रदीपच्या आईचे आजाराशी निगडित असलेले सगळे रिपोर्ट गौतमबुद्ध नगर येथील दवाखान्यात दाखवण्याचे सांगितले आहे आणि शक्य असल्यास त्यांच्यावर उपचारदेखील करण्यात येतील असे एलवाई यांचे म्हणणे आहे. सुहास एलवाई हे बॅडमिंटन प्लेअर आहेत. जन्मापासूनच त्यांचा पाय विकलांग आहे. लहानपणापासूनच क्रिकेट सारख्या खेळामध्ये त्यांना विशेष आवड होती. या संघर्षाच्या प्रवासात त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. भारताचे प्रतिनिधित्व स्वीकारत त्यांनी बॅडमिंटन खेळात ऑलम्पिक पदक पटकावले होते. गेल्या काही वर्षांपासून जिल्हाधिकारी पदाचा ते भार सांभाळत आहेत. सोशल मीडियावर प्रदीप मेहराचा व्हिडीओ पाहिल्यावर प्रदीपला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी त्यांनी प्रदीपला आपल्या कार्यालयात आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रदीपची पाऊले योग्य दिशेने जात आहेत आणि तो यशाचे शिखर नक्की गाठेल असा विश्वास आता तमाम जनतेला वाटत आहे.