सुदेश मांजरेकर आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित’ दे धक्का २’ हा चित्रपट येत्या ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अवघ्या काही तासातच त्याला लाखो लोकांनी चांगला प्रतिसाद आहे. २००८ सालच्या दे धक्का चित्रपटाच्या भरघोस यशानंतर या चित्रपटाचा सिकवल काढण्यात आला. या सिकवल मध्ये धनाजी, मकरंद जाधव, सुमती, सूर्यभान, सायली, किसना अशी आहे तीच पात्र दाखवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे प्रवीण तरडे देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत. मकरंद जाधव या मेकॅनिकने लावलेल्या एका शोधामुळे तो अब्जाधीश झाला आहे. अब्जाधीश झालेला मकरंद आता स्वतःची कार लॉन्च करणार आहे आणि त्या ब्रॅण्डचं नाव असणार आहे हनुमान.

जाधव कुटुंबाची ही लंडन वारी या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे त्यातून उडणारे धमाल किस्से प्रेक्षकांचे निश्चितच मनोरंजन करतील असा विश्वास चित्रपटाच्या ट्रेलरमधून वाटत आहे. मात्र या चित्रपटात सगळेजण गौरी वैद्यला खूप मिस करत आहेत. गौरी वैद्य हिने दे धक्का चित्रपटात सायलीची भूमिका साकारली होती. सायली उत्कृष्ट नृत्यांगना असते आणि तिला आपल्या नृत्याची कला सादर करण्यासाठी मुंबईला जावे लागत असते असे हे कथानक दे धक्का चित्रपटात पाहायला मिळाले. चित्रपटाच्या सिकवलमध्ये देखील सायलीच्या नृत्याचा आविष्कार तुम्हाला पाहायला मिळणार आहे मात्र सायलीच्या भूमिकेसाठी गौरी वैद्य हिच्या जागी आता महेश मांजरेकर यांची लेक गौरी इंगवले हिची वर्णी लागलेली पाहायला मिळत आहे. चित्रपटात अगोदरचे सर्व कलाकार असताना गौरी वैद्य का नाही? असा प्रश्न महेश मांजरेकर यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले की, ‘ गौरी वैद्य खूप चांगली डान्सर आहे, ती उत्तम अभिनय देखील करत होती. मात्र आता तिने एक वेगळं क्षेत्र निवडलं आहे. गौरी आता इंजिनिअरिंगला गेली आहे . तिच्यात आता इतकं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे की तिला कोणी ओळखलंच नसतं. किसनाची भूमिका साकारणारा सक्षम हा तरी थोडा ओळखता येतो. त्यामुळे आता काय करायचं हा प्रश्न पुढे उभा असतानाच आमची गौरी सायलीच्या भूमिकेसाठी सापडली.’

अर्थात महेश मांजरेकर यांनी आपल्या लेकीला या चित्रपटातून पुन्हा एकदा संधी मिळवून दिली असली तरी गौरी इंगवले ही उत्तम अभिनेत्री आहे हे पांघरून चित्रपटातून पाहायला मिळाले होते . ती उत्तम नृत्यांगना देखील आहे हे कुटूंब चित्रपटात पाहायला मिळाले. त्यामुळे गौरी इंगवलेसाठी ही भूमिका तितकीच महत्वाची ठरली आहे. २००८ नंतर गौरी वैद्य फारशा कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाली नाही मात्र २००८ नंतर आता गौरी कशी दिसते याचीही उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. अर्थात तिच्या दिसण्यामध्ये कमालीचा बदल झाला असला तरी ती एका वेगळ्या क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहत आहे. त्यामुळे गौरी वैद्य हिने अभिनय क्षेत्राला राम ठोकला असला तरी तिने पुन्हा या क्षेत्रात परत यावे अशी तिच्या चाहत्यांची ईच्छा आहे. पण अभिनय म्हणजे सर्व काही नाही आपल्या आवडी प्रमाणे काम करावे त्यातच खरा आनंद आहे हे कदाचित तिने ओळखलं असावं.