स्टार प्रवाह वर “मी होणार सुपरस्टार- जल्लोष डान्सचा” हा ग्रँड रिऍलिटी शो २१ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला. शोच्या स्पर्धकांनी ग्रुप डान्स, सोलो डान्स , ड्युएट या नृत्य प्रकारातून अल्पावधीतच परिक्षकांची आणि प्रेक्षकांची देखील मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. या डान्स शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री बालगुडे साकारत असून नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे आणि कृती महेश या शोच्या कॅप्टनची भूमिका बजावत आहे. अभिनेता अंकुश चौधरी या शोच्या माध्यमातून कित्येक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसत आहे.

तो परीक्षकाच्या भूमिकेत असला तरी वेळोवेळी स्पर्धकांना ऊर्जा देण्याचे काम तो करताना दिसत आहे. यातूनच अंकुश चौधरीचा आणखी एक हळवा कोपरा प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला त्याचे कौतुक सर्वच स्तरातून केले गेले आहे. नुकतच या शोच्या माध्यमातून गणेशोत्सव विशेष भाग सादर करण्यात आला होता. ज्यात सोनू कदम या नावाच्या स्पर्धकाने ‘माऊली माऊली…’ या गाण्यावर नृत्य सादर केले. त्याने ह्या गाण्यावर केलेल्या नृत्याचे भरभरून कौतुक झाले. मात्र सोनू कदमच्या बाबतीत एक गोष्ट समोर आली ती म्हणजे ह्या शोमध्ये येण्यासाठी सोनुने आपली हातची नोकरी सोडली होती. नोकरी सोडल्यामुळे घरासाठी घेतलेल्या ४ लाखांच्या कर्जाचे हप्ते देखील थकले आहे. सोनूचे डान्स विषयी प्रेम आणि आत्मीयता पाहून अंकुश चौधरीने त्याचे कर्ज फेडण्यासाठी हातभार लावला आहे. ‘तुझ्या हप्त्यांचे जे काही पैसे असतील ते मी देतो, तू काळजी करू नकोस’….असे म्हणून सोनू कदमला त्याने आश्वस्त केले आहे. अंकुश चौधरीचा हा दिलदारपणा उपस्थितांच्या आणि तमाम प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणून गेला. त्याच्या मनातला हा हळवा कोपरा प्रेक्षकांनाही अनुभवता आल्याने अंकुश चौधरीचे कौतुक होताना दिसत आहे.

दरम्यान या ग्रॅण्ड रिअलिटी शोमध्ये येण्याअगोदर अंकुश म्हणाला होता की, ‘पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळताना अतिशय आनंद होत आहे. विशेष म्हणजे मी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदाच जोडला जातोय आणि जजची भूमिकाही पहिल्यांदाच पार पाडतोय. डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. पुन्हा एकदा तीच उर्मी आणि तोच उत्साह या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवायला मिळेल. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे.’