आयुष्याच्या वाटेवरून जात असताना खाचखळगे पार करत, मोठमोठाली आव्हानं पेलत यशाच्या शिखरावर पोहोचलो तरी आपले पाय जमिनीवर ठेवणारे अनेक व्यक्ती तुम्हाला भेटतील. त्यातील एक म्हणजे अभिनेत्री स्नेहल शिदम होय. अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करत, लोकांचे टोमणे ऐकत स्नेहल शिदम हिने एक विनोदी अभीनेत्री म्हणून स्वतःचे नाव लौकिक केलं आहे. आपल्या दिसण्यावरून तिला अनेकांनी हिणवले आहे, तर अनेकांनी नाकं सुद्धा मुरडली आहेत. तू अभिनेत्रीची मैत्रीण , बहीण अशा कुठल्याच साच्यात बसत नाहीस, त्यामुळे आम्ही तुला ही भूमिका का देऊ? अशी अनेक नकारात्मक उत्तरं तिला ऑडिशनच्या वेळी मिळायची. मात्र चला हवा येऊ द्या मध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय स्नेहलला तिचे आयुष्य बदलून जाणारा ठरला.

चला हवा येऊ द्या या शोमुळे स्नेहल मराठी सृष्टीत स्थिरस्थावर झाली. मी का काळी आहे?, मी का जाड आहे? याची आठवण जवळचीच माणसं तिला कायम करून द्यायचे. त्यामुळे ह्या गोष्टी कितीही बाजूला केल्या तरी त्या डोक्यातून जात नाहीत असे स्नेहल म्हणायची. स्नेहलने अतीशय खडतर परिस्थितीतून तिचं हे यश मिळवलं आहे. या यशामागे तिची मेहनत आणि जिद्द आहे हे विसरून चालणार आहे. स्नेहल सर्वसामान्य कुटुंबात वाढलेली मुलगी. चाळीत एका छोट्याशा खोलीत तिचे कुटुंब राहायचे. शाळेमध्ये असल्यापासूनच स्नेहल नाटकातून ,सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग घ्यायची. घरची परिस्थिती बेताचीच मात्र घरखर्चाला हातभार लागावा म्हणून स्नेहलची आई दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाची कामं करायची. एकदा स्नेहलच्या नृत्याचा कार्यक्रम बघायला घरातली सगळी मंडळी गेली होती त्यावेळी कार्यक्रम आटोपून घरी परतल्यावर उंदरांनी बनवून ठेवलेल्या अन्नाची नासधूस केली होती. आता खायचं काय? हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आ वासून उभा होता. तेव्हा वडिलांनी घराला डागडुजी करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे घर छोटं पडतं म्हणून दुसऱ्या घरात ते शिफ्ट झाले. मात्र पुरेशा जागेअभावी स्नेहलला तिची बक्षिसं विकावी लागली होती. त्यावेळी तिची इच्छा असूनही तिला ती बक्षिसं ठेवता आली नाही.

पुढे कॉलेजचे शिक्षण झाल्यावर जवळचेच नातेवाईक तिला तिच्या रंगाची आठवण करून द्यायचे. ही अजून काहीच करत नाही म्हणून हिनवायचे. ऑडिशनच्या वेळी मैत्रिणीच्या रोल साठी तिला बोलावले जायचे. मात्र या भूमिकेत तू फिट बसत नाहीस मग आईची भूमिका कर, पण वयामुळे तुला ही भूमिका शोभणार नाही असे म्हणून तिला रिजेक्ट केले जायचे. शेवटी चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल या शोमध्ये येण्यासाठी तिने फेम भरला. या शोमध्ये येऊन स्नेहलने आपल्या विनोदी अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या शोमुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली असे स्नेहल म्हणते. या शोनंतर स्नेहलला अनेक मालिकामधून छोट्या मोठ्या भूमिका मिळत गेल्या. विनोदी अभिनेत्री होणं हे खरं तर खूप कठीण काम असतं मात्र स्नेहल ने तिच्या अभिनयाने ते सहजतेने पूर्ण केलं.