कलर्स मराठी वाहिनीवर नवी मालिका दाखल होत आहे. Iris प्रॉडक्शन प्रस्तुत ‘भाग्य दिले तू मला’ ही नवी मालिका येत्या ४ एप्रिल पासून रात्री ९.३० वाजता प्रसारित केली जात आहे. अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळे या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली तुझ्या रूपाचं चांदणं ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे. तन्वी शेवाळे आणि रोहित निकम यांनी या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. मात्र अवघ्या काही महिन्यातच प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने या मालिकेला आपला गाशा गुंडाळावा लागत आहे.

गेल्या महिन्यात या मालिकेने ५० भागांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसून येत आहे. अर्थात ही मालिका निरोप घेणार की नव्या मालिकेच्या एंट्रीमुळे वेळेत बदल केले जाणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. तूर्तास अभिनेत्री तन्वी मुंडले पुन्हा एकदा नव्या मालिकेतून मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तन्वीने झी मराठीवरील पाहिले न मी तुला या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. ही तिची मुख्य भूमिका असलेली पहिली मराठी मालिका ठरली. तन्वी मुंडले ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळची.बाबा वर्धम या नाटकाच्या ग्रुपमधुन तीने रंगभूमीवर पदार्पण केले. बीएस्सी फिजिक्सची पदवी मिळवलेल्या तन्वीला अभिनयाची ओढ लागली. युथफेस्टिव्हल, राज्यनाट्य स्पर्धा आणि एकांकिकामधून तिला काम करण्याची संधी मिळाली. पुण्यातील ललीतकला केंद्र मध्ये अभिनयाचे बारकावे शिकल्यावर तिला झी मराठीवरील मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. भाग्य दिले तू मला या मालिकेत तन्वी मुंडले विवेक सांगळे सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. भाग्य दिले तू मला या मालिकेत योगेश केळकर, जान्हवी किल्लेकर आणि पूर्वा कौशिक हे कलाकार महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ‘ त्याला नाविन्याची कास तर तिला संस्कृती जपण्याचा ध्यास, कसा होईल त्यांचा एकत्र प्रवास?’ …असे म्हणत नायक नायिकेच्या रंजक प्रेमाचा प्रवास या मालिकेतून उलगडताना पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेसाठी तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे यांना खूप खूप शुभेच्छा…