कलर्स मराठी वाहिनीवरील ” चंद्र आहे साक्षीला” या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. चिन्मय मांडलेकर यांचे कथानक असलेल्या या मालिकेचा पहिला भाग ११ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसारित झाला होता तर १७ एप्रिल २०२१ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट केला गेला. साधारण पाच महिन्यांच्या कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले अर्थात सुबोध भावे, आस्ताद काळे, ऋतुजा बागवे, उमा सरदेशमुख, नक्षत्रा मेढेकर यांच्या सहजसुंदर अभिनयाने ही मालिका अधिकच रंगत गेली हे वेगळे सांगायला नको. मालिकेने निरोप घेतल्यावर सर्व कलाकारांनी एकत्रित येऊन मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत.

आजकाल मालिकांना टीआरपी मिळावा म्हणून मूळ कथेला अनेक फाटे दिलेले दिसतात मग त्यात पाणी घालून कथानक भरकटायला लागले की ती मालिका न पाहावीशी वाटायला लागते. चंद्र आहे साक्षीला ही मालिका या गोष्टीला अपवाद ठरणारी आहे मुळात कसलेले कलाकार या मालिकेला लाभल्याने ही मालिका अधिकच खुलून आली होती आणि त्यात विशेष बाब म्हणजे कुठल्याही प्रकारे मालिकेचे कथानक लेखकाने पाणी घालून वाढवले नाही किंवा कथानकाला फाटे दिले नाहीत याचे कौतुक प्रेक्षकांनी न विसरता केलेले दिसून आले. मधल्या काळात सुबोधचे म्हणजेच तो श्रीधरची भूमिका साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचे वागणे प्रेक्षकांना खटकलेले दिसले मात्र त्यानंतर हळूहळू या कथेचा उलगडा होत गेला तशी मालिका अधिकच खुलत गेलेली दिसली. मालिकेच्या मूळ कथानकाची लांबी न वाढवता ती आटोपती घेतली यामुळे प्रेक्षक आता खूपच भारावून गेलेले दिसत आहेत. या मालिकेप्रति तशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मिडियावरून प्रेक्षक देताना दिसत आहेत. श्रीधर, स्वाती, सुमन आणि संग्राम या चार प्रमुख पात्रांभोवती गुरफटलेली ही मालिका आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार नसली तरी त्याची गोड आठवण कायम रसिकांच्या स्मरणात राहील आणि यापुढेही अशाच स्वरूपाच्या मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडतील अशी जाणीव त्यांनी करून दिली.