
बाकरवडी आणि उत्कृष्ट मिठाई असं नुसतं म्हटलं तरी पटकन ओठांवर चितळे बंधू हे नाव येतं. फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण देशभरात चितळेंच्या मिठाईचा गोडवा पसरलेला आहे. अशात आज चितळे या ब्रँड बद्दल आणि त्याच्या मालकांबद्दल थोडी माहिती जाणून घेऊ. चितळे आणि पुण्याचं एक वेगळच कनेक्शन आहे. अशात अनेकांना असं वाटत की, पुण्यामध्येच चितळे ब्रँडचा उदय झाला. तुम्हालाही असं वाटतं असेल तर, थांबा तुम्ही चुकताय कारण चितळे ब्रँडची पाहिली शाखा पुण्यात नाही तर सांगली येथे उभारण्यात आली होती.

भास्कर गणेश उर्फ बाबासाहेब चितळे यांनी १९३९ साली सांगली येथील एका भिलवडी या छोट्या गावात दुग्धउत्पादनावर व्यवसाय सुरू केला होता. पुढे त्यांच्या दुसऱ्या पिढीतील काकासाहेब आणि नानासाहेब चितळे यांनी ही कंपनी पुढे चालवली. पुढे विविध तंत्रज्ञानाच्या आधारावर त्यांनी दुधापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ चविष्ट मिठाई विकायला सुरुवात केली. पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय वाढत गेला. उत्तम सुरू राहिला आणि चितळे यांच्या पिढीतील एक गृहस्थ पुण्यात स्थायिक झाले. तेव्हा रघुनाथराव चितळे आणि नरसिंहराव चितळे यांनी पुण्यातील बाजीराव रोड येथे पाहिलं दुकान सुरू केलं. पुणे शहरातलं चितळेंच हे पहिलंच दुकान होतं. पुण्याच्या या दुकानात त्यांनी अनेक दुग्धजन्य पदार्थांची रास लावली. तसेच उत्तम स्वाद असलेली खुसखुशीत आणि मराठी माणसाची तिखट खाण्याची आवड लक्षात घेता बाकरवडीवर एक प्रयोग केला. तो प्रयोग यशस्वी ठरला, आणि मग काय आजही अवघ्या ३ ते ४ तासांत दुकाने बाहेर बाकरवडी संपल्याचा फलक लागू लागला.

चितळेंच्या बाकरवडीला खवय्यांनी डोक्यावर घेतलं. यामुळे चितळे बंधूंनी प्रसिद्धी आणि मोठी आर्थिक संपत्ती कमावली आहे आणि कमवतही आहेत. अशात सहसा आपण पाहतो की, प्रसिद्धीची धुंद अनेकांना वाईट मार्गाला घेऊन जाते. लोक माणुसकी विसरतात आणि श्रीमंतीचा माज दाखवू लागतात. मात्र चितळेंच्या मिठाई प्रमाणेच त्यांच्या मनातील गोडवा देखील कायम आहे. आपण कमवलेल्या संपत्तीचा बराचसा हिस्सा ते गरजूंना देत असतात. अशात सिमेवर आपल्या जीवाची पर्वा न करता सैनिक शत्रूंशी झुंज देत असतात. सन उत्सव आले की, आपल्या मातृभूमीचे ऋण आणि कर्तव्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना देखील भेटता येतं नाही. मात्र दर वर्षी चितळेंची खमंग बाकरवडी आणि मिठाई या सैनिकांच्या भेटीला येत असते. चितळे तब्बल १०,००० मिठाईचे बॉक्स सैनिकांना वाटतात.