९० च्या दशकातील या लोकप्रिय अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान डोक्यावर केस नसल्याने चित्रपटाच्या ऑफर नाकारल्या

बॉलिवूड सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरी हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे . महिमा चौधरी हिने परदेस या चित्रपटातून बॉलिवूड सृष्टीत पाऊल टाकले होते. शाहरुख खान, संजय दत्त, सुनील शेट्टी अशा अनेक कलाकारांसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महिमा चौधरी बॉलिवूड पासून दूर राहिलेली पाहायला मिळाली. बॉबी मुखर्जी सोबत महिमाने लग्न केले होते मात्र काही वर्षातच त्यांचे नाते संपुष्टात आले. महिमा आता सिंगल मदर असून अरियाना या तिच्या लेकीचा ती एकटीने सांभाळ करताना दिसत आहे. अशातच काही महिन्यांपूर्वी महिमाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. अनुपम खेर यांनी महिमाची ही कहाणी तिच्याच तोंडुन चाहत्यांना ऐकवली आहे.

एका प्रोजेक्टसाठी अनुपम खेर यांनी महिमा चौधरीला ऑफर देऊ केली होती. मात्र त्यासाठी तिने नकार दिला होता. महिमा का नकार देतीये हे अनुपम खेर यांना जाणून घ्यायचे होते आणि तूच हा प्रोजेक्ट करणार आहेस असेही ठणकावून सांगितले होते त्यावेळी महिमाने ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्याचे अनुपम खेर यांना सांगितले. केमो थेरपीमुळे महीमाचे डोक्यावरचे केस गळाले होते. अशातच तिला वेबसिरीज, चित्रपटासाठी ऑफर येऊ लागल्या मात्र डोक्यावर केस नसल्याने तिने या ऑफर नाकारल्या होत्या. महिमा चौधरी आपल्याला कॅन्सरचे निदान कसे झाले हे सांगताना म्हणते की, ‘मी दर वर्षी सोनोग्राफी, ब्लड चेकअप यासारखे रुटीन चेकअप करत असते. त्यात तिच्या डॉक्टरांनी ऑकॉलॉजिस्ट असलेल्या मंदारचे नाव सुचवले. तेव्हा मी लगेचच मंदारची भेट घेतली. त्यांनी हे प्रिकॅन्सर सेल्स असल्याचे सांगितले. परंतु हे सेल्स कधी कॅन्सरचे रूप धारण करतात तर कधी नाही पण ह्या पेशी काढायच्या आहेत किंवा नाहीत हे सर्वस्वी तुमचा निर्णय असेल असे म्हटल्यावर महिमाने लगेचच त्या पेशी काढण्यास सांगितले. बायोप्सी करून ह्या पेशी बाहेर काढण्यात आल्या तेव्हा डोक्टरांना त्या पेशींच्या एका बाजूला कॅन्सर झाल्याचे समजले. ही शस्त्रक्रिया होत असताना डॉक्टरांनी माझ्या मानेत एक पोर्ट टाकला आणि केमोथेरपी करावी लागेल असा सल्ला दिला. तेव्हा मी पुरती खचून गेले होते. मी लगेचच रडायला लागले. हे मी माझ्या आईवडिलांना सुद्धा सांगितले नव्हते.

परंतु माझी बहिण त्यावेळी धीर देत म्हणाली की तू ७०च्या दशकात जगत नाहीयेस आता डॉक्टरांना यावरचे उपचार माहीत आहेत. आईला मी १० दिवस भेटू शकणार नव्हते त्यावेळी मी तिला स्तनात एक साधी गाठ असल्याचे सांगितले ती फक्त काढणार आहे त्यासाठी माझी तुझ्यासोबत भेट होणार नाही. परंतु हे सत्य जेव्हा तिला कळले त्यावेळी तिचा बीपी कमी जास्त होत होता ती अक्षरशः बेशुद्ध होऊन पडली होती.मला कॅन्सर झाला हे कळल्यावर माझ्या घरातले सगळेचजण रडत होते पण यातून मला एका लहान मुलाकडून मोठी प्रेरणा मिळाली. केमोथेरपी करून झाल्यावर मी खूप रडायची पण त्या छोट्याशा मुलालासुद्धा कॅन्सर झाला होता. तो ह्या सर्व गोष्टी खूप पॉजिटिव्हली घेत होता. केमोथेरपी झाल्यावर मी फक्त पाच दिवस झोपुन राहतो त्यानंतर मी खूप खेळायला लागतो असे तो हसत म्हणायचा. त्याचे हे बोलणे पाहून ह्या छोट्याश्या मुलाकडून मला खूप काही शिकायला मिळालं’. महिमा चौधरी ही खऱ्या आयुष्यात एका हिरोसारखी आहे असे म्हणत अनुपम खेर यांनी तिचे कौतुक केले आहे. महिमाला तुमच्या पाठिंब्याची, शुभेच्छांची गरज आहे . ती पुन्हा सेटवर येऊन पूर्वीसारखीच उडायला सज्ज झाली आहे. तिच्यातील कलागुणांना वाव देण्याची हीच एक संधी आहे असे म्हणत त्यांनी तमाम निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाना हे आवाहन केलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनुपम खेर यांची सोशल मिडियावरची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.