नायका इतक्याच खलनायकाच्या भूमिका देखील तितक्याच तगड्या मानल्या जातात. हे बहुतेक खलनायक साकारणाऱ्या अभिनेत्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. बॉलिवूड सृष्टीत एक काळ असा होता की ज्या काळात नायक जेवढा देखणा तेवढाच खलनायक विद्रुप दाखवला जायचा ज्यामुळे त्याच्या अभिनयाची ताकद तगडी होण्यास मदत मिळायची. असाच एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे आज सकाळी हार्ट अटॅकने निधन झाले असल्याचे समोर आले आहे. हे ज्येष्ठ अभिनेते आहेत सलीम घौस. सलीम घौस हे ७० वर्षांचे होते. १९७८ साली स्वर्ग नरक या चित्रपटातून सलीम घौश यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ते मूळचे चेन्नईचे. हिंदी चित्रपटासोबतच त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटातून आपल्या सजग अभिनयाची ताकद दाखवून दिली होती. ‘मंथन’, ‘कलयुग’, ‘चक्र’, ‘सारांश’, ‘मोहन जोशी हाजिर हो’, ‘त्रिकाल’, ‘अघाट’, ‘द्रोही’ , ‘थिरुदा’ , ‘सरदारी बेगम’, ‘कोयला’, ‘सोल्जर’, ‘अक्स’, ‘वेट्टाइकरन वेल डन अब्बा और का’ सारख्या चित्रपटातून त्यांनी दमदार भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या.

केवळ चित्रपट नव्हे तर मालिका सृष्टीत देखील त्यांनी आपले नाव लौकिक केले होते. श्याम बेनेगल यांच्या ‘भारत एक खोज’ मालिकेत ते राम, कृष्ण आणि टीपू सुल्तान अशा विविध भूमिका साकारल्या होत्या. वागळे की दुनिया या मालिकेचा देखील ते हिस्सा बनले होते. १९८७ सालच्या सुबह या मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले होते. कोयला, सोल्जर, बादल चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या भूमिका रंगवल्या होत्या. मालिका चित्रपट हा प्रवास सुरु असताना काही काळ त्यांनी ब्रेक घेतला होता मात्र खूप वर्षानंतर त्यांना एका चित्रपटात तसेच मालिकेत झळकण्याची संधी मिळाली होती. काही परदेशी तसेच दाक्षिणात्य चित्रपटासाठी त्यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केले होते. सलीम घौश यांचा मुलगा देखील अभिनेता आहे मात्र त्याला या क्षेत्रात फारसे यश मिळालेले नाही. आज गुरुवारी २८ एप्रिल रोजी सकाळीच सलीम घौश यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या निधनाची बातमी मीडियामाध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. बॉलिवूड सृष्टीतील एक काळ गाजवलेला हरहुन्नरी कलाकार गमावल्याने बॉलिवूड सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.