सुरुवातीला मला दाढी दाखवण्यात आली त्यावेळी मी खूप टेन्शनमध्ये अफजलखानच्या भूमिकेबाबत मुकेश ऋषी यांनी दिले स्पष्टीकरण

फत्तेशीकस्त, फर्जंद, पावनखिंड या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शीत आणि अभिनित केलेला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. शेर शिवराज या चित्रपटात दिग्पाल लांजेकर यांनी बहिर्जी नाईकांचे पात्र साकारले आहे. चित्रपटातील त्यांच्या या लुकचे मोठे कौतुक केले जात आहे. शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या चोवीस तासात हा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय झाला असून ट्रेंडिंगमध्ये नंबर एक येऊन पोहोचला आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर छत्रपतींच्या भूमिकेत दिसणार आहे तर मृणाल कुलकर्णी जिजाऊंची भूमिका साकारणार आहेत. मृण्मयी देशपांडे, वर्षा उसगावकर, माधवी निमकर, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, दीप्ती केतकर अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली आहे.

विशेष म्हणजे बॉलिवूड चित्रपट अभिनेते मुकेश ऋषी अफजल खानाची भूमिका साकारणार आहेत. सुरुवातीला अफजलखानची एक पुसटशी झलक दाखवण्यात आली होती त्यावेळी ही भूमिका कोण करणार यावर चर्चा रंगल्या होत्या. मात्र मुकेश ऋषी ही भूमिका साकारणार असल्याचे समजल्यावर अनेकांनी आनंद व्यक्त केला होता. ही भूमिका साकारताना मुकेश ऋषी यांनी आपले अनुभव सांगितले आहेत. ते म्हणतात की, दिग्पाल लांजेकर यांनी मला अफजल खानाच्या भूमिकेबाबत विचारले त्यावेळी मी ही भूमिका साकारण्यास खूपच उत्सुक होतो. ते अतिशय अभ्यासू आणि मेहनती दिग्दर्शक आहेत या भूमिकेबाबत त्यांचा खूप अभ्यास आहे आणि तो प्रेक्षकांच्यासमोर कशा प्रकारे साकारायचा याची त्यांना जाणीव आहे. याअगोदर मला इंग्रजी चित्रपटात ह्याच भूमिकेबाबत विचारण्यात आले होते मात्र त्याबाबत पुढे काहीच बोलणे झाले नाही. अफजलखान म्हटल्यावर डोळ्यासमोर उभा राहतो तो दाढीवाला धिप्पाड देहयष्टी असलेला खलनायक. मी बहुतेक चित्रपटात दाढी वापरलेली नाही त्याला आता खूप वर्षे लोटली होती परंतु या भूमिकेसाठी मला दाढी दाखवण्यात आली त्यावेळी ती दाढी पाहून मी खूप टेन्शनमध्ये होतो कारण दाढी असली की तुम्ही कम्फर्टेबल नसता मात्र या भूमिकेसाठी तसा गेटअप करावा लागणार याची मला कल्पना होती कारण ही दाढीच या भूमिकेची खरी ओळख होती. चित्रपटासाठी मला एक महिनाअगोदरच स्क्रिप्ट देण्यात आली होती.

हे डायलॉग म्हणत असतानाच मला या भूमिकेची ताकद समजली होती. मी उत्तरभारतीय असल्याने मला उर्दू भाषेची चांगली जाण आहे आणि ही भाषा मी चांगल्या प्रकारे बोलू शकतो. चित्रपटातला माझा लूक खूप क्रूर दाखवण्यात आला आहे मी जेवढा क्रूर दिसेल तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उठावदार होईल हे मला जाणून होते त्यामुळे मला माझ्या भूमिकेबाबत कुठलीच सहानुभूती नको होती. अफजलखानच्या भूमिकेमुळे प्रेक्षक माझा तिरस्कार करणार याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु आजकाल सर्वानाच या अभिनय क्षेत्राबाबत आणि पडद्यामागच्या गोष्टींबाबत माहीत झाले आहे . माझ्या सोसायटीतली लहान मुलं माझ्यासोबत खेळतात त्यामुळे त्यांना माहीत झाले आहे की मी चित्रपटात काम करतो. माझ्या भूमिका खलनायकी ढंगाच्या आहेत तुम्हाला या भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवायच्या असतील तर तुम्हाला त्या तितक्याच ताकदीने उभ्या कराव्या लागतात. या चित्रपटाचे पोस्टर मी माझ्या घरात लावणार असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले आहे.