काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचा ऍक्सिडंट झाला होता. उज्जैन येथील महाकाल मंदिरात ती दर्शनासाठी जात होती. मात्र हा दिवस माझ्यासाठी खूप साहसी होता असे ती म्हणते कारण रस्त्यातच तिच्या गाडीचे ब्रेक फेल झाले होते यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी क्रॅश होऊन मोठा अपघात घडून आला. या अपघातात तनुश्री दत्ताच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. ही दुखापत एवढी गंभीर होती की त्यावर टाके घालण्यात आले आहेत.

उज्जैन येथील मंदिरात जात असताना हा अपघात घडून आला होता. मात्र अशा परिस्थितीत देखील तिने मंदिरात जाऊन महाकालचे दर्शन घेण्याला प्रथम प्राधान्य दिले. पायाने लंगडतच ती कशीबशी मंदिरात पोहोचली होती. दर्शन घेऊन परतल्यावर तिने नंतर रुग्णालयात धाव घेतली. पायाला झालेली जखम जास्त असल्याने त्यावर उपचार करून टाके घालण्यात आले होते. या घटनेची माहिती तानुश्रीने फोटोसहित सोशल मीडियावर शेअर केली आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप कठीण होता हा अपघात एवढा गंभीर होता मात्र यातून मी सुखरूप बचावले असे तानुश्रीने स्पष्टीकरण दिले आहे. तनुश्री दत्ताने फेमिना मिस इंडिया चा किताब मिळवला होता इथूनच तिला बॉलिवूड सृष्टीत झळकण्याची संधी मिळाली होती. आशिक बनाया आपने या चित्रपटामुळे तनुश्री प्रकाशझोतात आली होती. चॉकलेट, ३६ चायना टाऊन, रिस्क, ढोल, भागम भाग या मोजक्याच चित्रपटातून ती प्रेक्षकांसमोर आली. मात्र मी टू चळवळीमुळे तनुश्रीला अमाप प्रसिद्धी मिळाली.

या मोहिमेत तिने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. हॉर्न ओके प्लिज या चित्रपटात काम करत असताना नाना पाटेकर यांनी लैंगिक छळ केला असल्याचा तिने आरोप केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशीही मागणी जोर धरताना दिसली होती मात्र नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप ती सिद्ध करण्यास असमर्थ ठरली होती. यावरून तनुश्री दत्ताला अनेकांनी धारेवर धरले होते. गेल्या अनेक वर्षांपासून तनुश्री बॉलिवूड सृष्टीपासून थोडीशी दुरावलेली पाहायला मिळत आहे ते याच कारणामुळे. असे असले तरी तिच्या चाहत्यांनी मात्र तिची बाजू सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. आता तिच्या अपघाताच्या बातमीने तिच्या चाहत्यांनी तिला काळजी घेण्यास सांगितले आहे.