
मराठी बिग बॉस सिजन ३ चा प्रवास नुकताच सुरू झाला असून या शोमध्ये विविध क्षेत्रातील स्पर्धकांनी सहभाग दर्शवलेला पाहायला मिळतो आहे. अभिनेता विकास पाटील, स्नेहा वाघ, अविष्कार दारव्हेकर, गायत्री दातार, जय दुधाणे, शिवलीला बाळासाहेब पाटील, सुरेखा कुडची, तृप्ती देसाई, मीरा जगन्नाथ,उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, सोनाली पाटील, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादूस) , मीनल शाह असे तब्बल १५ स्पर्धक बिग बॉसच्या घरात नुकतेच दाखल झाले आहेत. या शोमध्ये सहभागी झालेली शिवलीला बाळासाहेब पाटील ही स्पर्धक बिग बॉसच्या घरात राहून भक्तिमय वातावरण निर्माण करणार आहे.

कारण शिवलीला पाटील हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिच्या किर्तनामुळे समाजप्रबोधन घडवून आणताना दिसत आहे. शिवलीला बाळासाहेब पाटील या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षापासूनच खेडोपाडी आणि शहरातून शिवलीला पाटील कीर्तन करत असे. तिच्या आईवडिलांनी तिचे नाव शिवलीला का ठेवले याचा किस्सा बिग बॉसच्या मंचावर तिच्याच आईने सांगितला. शिवलीलाची आई म्हणते की, लग्नानंतर सात ते आठ वर्षे झाली तरी त्यांना मूल होत नव्हते. त्यामुळे शिवलीला ग्रंथाचे त्यांनी १०८ वेळा पारायण केले. त्यानंतर काही दिवसांनी त्या डॉक्टरांकडे गेल्या त्यावेळी त्या प्रेग्नन्ट असल्याचे त्यांना सांगितले. जेव्हा मुलीचा जन्म झाला तेव्हा आपल्या लेकीचे नाव त्यांनी शिवलीला ठेवले. शिवलीला चे वडील बाळासाहेब पाटील हे देखील कीर्तनकार आहेत. त्यामुळे शिवलीलाला बालपणापासूनच कीर्तनाची गोडी निर्माण झाली. वयाच्या ५ व्या वर्षापासून शिवलीला कीर्तन करत आहे आजवर १० हजाराहून अधिक कीर्तनाचा टप्पा तिने पार पाडला आहे. कॉलेजमध्ये असतानाही तिने कीर्तनाची आपली आवड जोपासली होती.

कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, अधूनमधून विनोदाची पेरणी करत ती कीर्तन करते, तिनं स्वतःची एक शैली निर्माण केली आहे. ही शैली लोकांना भिडणारी आहे. सोशल मीडियावर तिला मानणारा एक चाहता वर्ग आहे. तरुणाईला साद घालत ती जीवनमूल्यं सांगते, लोकांशी संवाद साधून अभंगाचं निरूपण करते. कमी वेळेत महाराष्ट्रभर तिनं आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. सध्याच्या घडीला तरुण महिला कीर्तनकार म्हणून तिच्या नावाचा सगळीकडे बोलबाला पाहायला मिळतो आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावर देखील तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर असलेला पाहायला मिळतो. शिवलीला वादग्रस्त पण तितक्याच मनोरंजनात्मक बिग बॉसच्या घरात १०० दिवसांसाठी दाखल झाली आहे. या घरात ती प्रेक्षकांचे मनोरंजन तर करेलच आणि तितकेच भक्तिमय वातावरण देखील निर्माण करेल यात शंका नाही.