विशाल निकम हा कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता ठरला आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा महाअंतिम सोहळा २६ डिसेंबर रोजी पार पडला मात्र अजूनही विशालची लोकप्रियता कमी झालेली नाही. विशाल विजेता ठरला असल्याने त्याला अजूनही त्याचे चाहते भेटण्यासाठी त्याच्या घरी हजेरी लावताना दिसत आहेत. विशालने विजयाची ट्रॉफी जिंकताच त्याच्या गावी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत करण्यात आले होते. बैलगाडीत बसून त्याची गावकऱ्यांनी मोठ्या थाटात मिरवणूक काढली होती.

गावकऱ्यांचे आपल्यावरील प्रेम पाहून तो खूपच भारावून गेला होता. आजही त्याला ठिकठिकाणाहून त्याचे चाहते भेटायला येत आहेत. त्याची भेट घेऊन विशालचे अभिनंदन करत शुभेच्छा देत आहेत. अबालवृद्धांमध्ये विशाल निकम लोकप्रिय झालेला पाहायला मिळतो आहे. प्रेक्षकांचे हे प्रेम विशालला मात्र भारावून टाकणारे आहे. मीच नाही तर माझे आईवडील देखील माझ्या यशामुळे सेलिब्रिटी झाल्याचा आनंद अनुभवत आहेत असे तो म्हणतो. परंतु हे सर्व आनंदाचे क्षण अनुभवत असताना सद्य परिस्थितीमुळे त्याने आपल्या चाहत्यांना एक आवाहन केलं आहे की काही दिवस एकमेकांपासून दूर राहुयात…”जिंकल्याचा उत्साह आहे, आनंद आहे, मोठ्या संख्येने तुम्ही मला भेटायला येत आहेत, तुमचं नेहमीच स्वागत!! मात्र, मित्रांनो काही दिवस ब्रेक घेऊयात, महाराष्ट्र सरकारने सद्य परिस्थितीमुळे जे निर्देश दिले आहेत त्या निर्देशाच आपण पालन करूयात आपल्याला सद्य परिस्थितीचा प्रादुर्भाव रोखायचा आहे, सुदृढ महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळे आजपासून तीन दिवस एकमेकांपासून दूर राहुयात. ऑनलाइन भेटीगाठी तर होतच राहतील, थोडे दिवस हे निर्बंध पाळूयात….इथून पुढे काही दिवस आपण ऑफलाईन नाही तर ऑनलाइन भेटुयात नाराज होऊ नका भावांनो…”

असे म्हणत विशालने त्याच्या चाहत्यांना काही दिवस ऑफलाईन न भेटण्यासाठी विनंती केली आहे. विशाल निकमने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर म्हटल्याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा शिवलीला पाटील यांची भेट घेतली होती. पंढरपूर येथे जाऊन तो शिवलीला ताईंना भेटून आला होता. विशालने यादरम्यान मीडियाला अनेक मुलाखती दिल्या आहेत. त्यातून त्याला सौंदर्याबद्दल नेहमीच विचारण्यात आले आहे. सौंदर्याचे नाव मी लवकरच जाहीर करेन आणि तिला तुमच्यासमोर आणेल. परंतु आमच्यात काही दिवसांपूर्वी थोडा दुरावा निर्माण झाला आहे. आमच्यात काही मतभेद झाल्याने तिची मी अगोदर भेट घेणार आहे. मी विजेता झालो हे तिला कळताच तिने मला अभिनंदनाचा मेसेज केला होता. मी अजून तिला प्रत्यक्षात भेटलो नाही. तिची भेट घेऊन मी नक्कीच तिची समजूत काढणार आहे आणि योग्य वेळी तुमच्यासमोर आणणार आहे. असे स्पष्टीकरण त्याने सौंदर्याबद्दल दिलं आहे.