तृप्ती देसाई या भारतीय सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या असून भूमाता ब्रिगेड नामक संघटनेच्या त्या संस्थापक प्रमुख आहेत. २००८ मध्ये एका सहकारी बॅंकेच्या कारभाराबाबत आंदोलन करत त्या पुढे आल्या. २०११ मध्ये त्यांनी अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला होता तर २०१६ साली शनी शिंगणापूर येथील मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रीयांनाही पूजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन केले होते. या आणि अशा कित्येक आंदोलनामुळे तृप्ती देसाई नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत.

नुकतेच त्यांनी कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. या घरात असताना कीर्तनकार शिवलीला पाटील इंदुरीकर महाराजांबद्दल बोलताना दिसल्या. शिवलीला पाटील तृप्ती देसाईंबाबत म्हणाल्या की ‘ तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात केस केली होती’. तृप्ती देसाई यावर म्हणतात की,’ इंदुरीकर महाराजांची बरीचशी कीर्तने ही महिलांचा अपमान करणारी असतात. आम्ही तेंव्हा त्यांच्या विरोधात केस दाखल केली, आंदोलन केली त्यावेळी इंदुरीकर महाराजांची यु ट्युब वरची बरीच कीर्तने डिलीट करण्यात आली होती. युट्युबवर असलेली जवळपास ८०% कीर्तने त्यांनी डिलीट केली होती’. त्यावर शिवलीला पाटील यांनी आठवण करून देत असेही म्हणाल्या की, ‘केवळ इंदुरीकर महाराजांचीच नाही तर अनेक किर्तनकारांनी अशी कीर्तने डिलीट केली होती’. दरम्यान इंदुरीकर महाराजांनी महिलांनी फेटा घालण्याबाबत एक वक्त्यव्य केलं होतं की, महिलांनी फेटा घातल्यावर आम्ही काय गाऊन घालायचा का?…’

तृप्ती देसाई यांनी यावर स्पष्टीकरण देत असे सांगितले की , ‘ तेव्हा मी तशी मोहीमच राबवली होती, ज्यावेळी आम्ही आंदोलन पुकारले होते त्यावेळी संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात पुढे आला होता एवढेच नाही तर मला तिथं पोहोचायच्या आधीच १०० किलो मीटरवर असतानाच पोलिसांनी मला ताब्यात घेतले होते’. बिग बॉसच्या घरात कीर्तन, राजकारण, गायन आणि अभिनय क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली आहे त्यामुळे या घरात सगळ्यांची पोलखोल कशी होते हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. बिग बॉस मराठी असो वा हिंदी एकमेकांवर चिखलफेक करून आणि वादग्रस्त विधाने दाखवून नेहमीच प्रेक्षकांना आपल्या शो कडे खेचून आणण्याचे काम करताना दिसते.