मराठी बिग बॉसचे अनेक जण चाहते आहेत. बिग बॉसचा दुसरा सिजन देखील खूपच चर्चेत राहिला होता. शिव ठाकरे या दुसऱ्या सिजनचा विजेता ठरला होता. एमटीव्ही रोडीजमध्ये सहभागी झालेला शिव ठाकरे मराठी बिग बॉसमुळे आणखीनच लोकप्रियता मिळवून गेला. बिग बॉसच्या सिजन 2 चा विजेता शिव ठाकरे याच्या कारला नुकताच अपघात झाला आहे. शिव ठाकरे हा मुळचा अमरावतीचा. शुक्रवारी तो आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेला होता त्यावेळी प्रवासात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

अमरावतीहून अचलपूर कडे जात असताना शिव ठाकरेच्या कारला मागून एका टेम्पोने जोरदार धडक दिली होती. या जोरदार धडकेमुळे शिवची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात घुसली. स्टेअरिंगवर कंट्रोल असल्याने मोठा अनर्थ टळला असे शिव ठाकरे सांगतो. सुदैवाने या अपघातात शिवचे कुटुंब थोडक्यात बचावले आहे. मात्र शिवच्या गाडीला मागील बाजूस जोरदार धडक बसली असल्याने गाडीच्या मागचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात शिवच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर मोठी दुखापत झाली असून त्याची बहीण मनीषा ठाकरे हिच्या डोक्याला मुका मार लागला आहे. अपघातानंतर शिवच्या कुटुंबाने दवाखान्यात धाव घेतली आणि त्यावर उपचार केले. त्याच्या कपाळावर इजा झाल्याने पट्टी बांधण्यात आली आहे. आम्ही या अपघातातून थोडक्यात बचावलो असे शिव ठाकरे म्हणतो.

शिव ठाकरे ची बहीण मनीषा ठाकरे हिने बिग बॉसच्या घरात त्याला भेटायला हजेरी लावली होती त्यामुळे शिवची बहीण मनीषा बहुतेकांना परिचित असावी. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मनिषाला कन्यारत्न झालं त्यावेळी मी मामा झालो असे म्हणत शिवने ही आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली होती. या प्रवासात शिव ठाकरे त्याची बहीण, भाची आणि सोबत भाऊजी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या अपघातातून हे किरकोळ दुखापत वगळता सर्व कुटुंब थोडक्यात बचावलेले आहे.