मराठी बिग बॉसच्या घरातून नुकतेच निथा शेट्टी हिने एक्झिट घेतली आहे. केवळ दोन आठवडे बिग बॉसच्या घरात राहून निथाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र ह्या घरात ती कशी आहे हे दाखवायला तिला पुरेसा वेळ मिळाला नाही अशी खंत तिने व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घरात आता काही सदस्य प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. यादरम्यान निथा शेट्टी आणि आदिश वैद्य या दोन सदस्यांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती मात्र ते फार काळ या घरात राहू शकले नाही.

त्यामुळे आता लवकरच बिग बॉसच्या घरात आधीच्या एका सदस्याची पुन्हा एन्ट्री होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. कारण तशा स्वरूपाची एक पोस्ट त्याने सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे, त्यात तो म्हणतो की, “नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्री पेक्षा घराबाहेर पडलेल्या पैकी काही सदस्यांना पुन्हा संधी मिळाली तर…” अक्षयच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे आणि यावरून तो बिग बॉसच्या घरात पुन्हा दाखल होणार आहे असे तर्क लावले जात आहेत. बिग बॉसच्या घरात नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्यापेक्षा आता घराबाहेर पडलेला सदस्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिसून येते. हा सदस्य आहे अभिनेता अक्षय वाघमारे. अक्षय वाघमारेला बिग बॉसच्या घरामधून काही दिवसातच बाहेर जावे लागले होते अक्षय बाहेर जाताना घरातील प्रत्येक सदस्याला अश्रू अनावर झाले होते. महेश मांजरेकर यांनी अक्षयला घरामधल्या त्याच्या अनुभवाबद्दल विचारलं. तेव्हा तो म्हणाला, “मी सर्वांत जास्त जय, विशाल आणि उत्कर्षला मिस करेन. त्यानंतर विकास आणि तृप्तीताईंची आठवण येईल. त्या घरामध्ये राहणं खूप कठीण आहे.

मी टास्क खेळलो तेव्हा पूर्ण जीव ओतून खेळालो.” बिग बॉस मराठी ३ सिझनमध्ये घरामधून बाहेर पडणारा पहिला सदस्य अक्षय वाघमारे ठरला होता. त्यामुळे आपण खऱ्या आयुष्यात कसे आहोत हे दाखवण्यासाठी त्याला फार कमी कालावधी मिळाला होता. या कालावधीत देखील त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दादूसला जेव्हा मीठ खावे लागले होते त्यावेळी त्यांची झालेली अवस्था पाहून अक्षय अस्वस्थ झाला होता. यावरून अक्षय खूपच भावुक असल्याचे दिसून आले होते. घरात तो आपल्या चिमुकल्या लेकीला खूपच मिस करत होता त्यामुळे त्याने हा मधल्या काळातला संपूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवला होता. बिग बॉस मराठी ३च्या घरात अक्षयने पुनरागमन केले तर प्रेक्षकांना देखील ते नक्की आवडेल. पुढे काय होणार हे येत्या काही भागात पाहायला मिळणारच आहे.