मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजन मधील वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन धुमाकूळ घालणारा सदस्य म्हणजे आदिश वैद्य. आदिश वैद्यला सुरुवातीपासूनच क्रिकेटचे वेड होते. त्यासाठी तो प्रशिक्षण देखील घेत होता मात्र वयाच्या २२ व्या वर्षी क्रिकेट सोडून त्याने अभिनय क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले. कॉलनीतच एका कार्यक्रमात त्याने स्किट सादर केले होते तेव्हापासून त्याला कलाक्षेत्राची ओढ लागली. सुरुवातीला नाटक, एकांकिकामधून छोट्या छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली पुढे जाऊन त्याला नायकाच्या भूमिका मिळू लागल्या.

स्टार प्रवाहवरील ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेतून आदिशने छोट्या पडद्यावर पाउल टाकले होते. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेत त्याने आर्चिसची भूमिका गाजवली होती. कुंकू, टिकली आणि टॅट्यु, लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेतही तो महत्वाच्या भूमिकेत झळकला होता. जिंदगी नॉट आउट, बॅरिस्टर बाबू, गुम है किसीं के प्यार में, नागीण या हिंदी मालिका त्याने अभिनित केल्या आहेत. गुम है किसीं के प्यार में या मालिकेतून त्याने मोहितचे पात्र साकारले होते त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. बिग बॉसच्या घरात येण्यासाठी त्याने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. आदिश गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री “रेवती लेले” हिला डेट करत आहे. रेवती उत्कृष्ट नृत्यांगना असून या दोघांनी नागीण, जिंदगी नॉट आउट सारख्या मालिकेतून एकत्रित काम केले आहे. स्वामिनी या लोकप्रिय मराठी मालिकेत रेवतीने रमाबाईंची भूमिका निभावली होती. या भूमिकेमुळे रेवतीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. वर्तुळ, आपकी नजरों ने समझा अशा आणखी हिंदी मराठी मालिकेत तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

मालिकेतून एकत्रित काम करत असताना दोघांच्यात मैत्रीचे सूर जुळून आले होते त्यानंतर हे दोघेही एकमेकांना पसंत करू लागले तशी तिच्यासोबतच्या प्रेमाची कबुली देखील त्याने सोशल मीडियावर दिली होती. आदीश आणि रेवती दोघांचे एकत्रित असलेल्या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांकडून नेहमीच पसंती मिळताना दिसते. आता लवकरच रेवती स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होत असलेल्या ‘लग्नाची बेडी’ या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ३१ जानेवारीपासून दुपारी १.०० ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्नाची बेडी ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे दिसून येते. आदिश वैद्य ज्या मालिकेत काम करत होता त्याच हिंदी मालिकेचा म्हणजेच गुम है किसीं के प्यार में या मालिकेचा रिमेक असणार आहे. या मालिकेत रेवती लेले सोबत सायली देवधर आणि संकेत पाठक हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत. हिंदी मालिकेत झलकल्यानंतर रेवतीने पुन्हा आपली पावले मराठी सृष्टीकडे वळवली आहेत. या नव्या मालिकेसाठी रेवती लेले हिला मनःपूर्वक शुभेच्छा…