मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये विशाल निकमने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. त्यामुळे या तिसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले मीरा जगन्नाथ आणि जय दुधाने हे स्पर्धक उत्कर्ष शिंदेच्या गाण्यातून झळकलेले पाहायला मिळाले. तर विकास पाटीलने देखील कोल्हापूर येथील गलगले या गावी छानसे घर बांधल्यामुळे चर्चेत राहिले होते मात्र बिग बॉसचा विजेता विशाल निकम मात्र सध्या तरी कुठल्याच प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर आला नाही. त्यामुळे विशाल अजून आपल्या विजेत्यापदाचा आनंद घेताना दिसत आहे.

याच आनंदात विशालने नव्या गाडीची खरेदी करून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. लोकल ट्रेन आणि बाईकने प्रवास करत इथपर्यंत पोहोचलोय आता लांबचा पल्ला गाठायचा म्हटलं तर सोबतीला गाडी असलेली बरी, बाकी तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद आहेच! असे म्हणत त्याने गाडी घेतल्याचा हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. विशालने तब्बल १७ ते १९ लाखांची Tata Herrier ही गाडी खरेदी केली आहे. सांगली येथील रुक्मिणी या निवासस्थानी त्याची पहिली वहिली स्वकमाईतील चार चाकी गाडी मोठ्या दिमाखात उभी केली आहे त्याचे फोटो विशालने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दख्खनचा राजा ज्योतिबा, साता जलमाच्या गाठी, जय भवानी जय शिवाजी अशा मालिकांमधून विशाल मुख्य तसेच सहाय्यक भूमिकेत दिसला होता. विशाल निकम हा सुरुवातीला फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने मॉडेलिंग क्षेत्राकडे आपली पावले वळवली होती. अभिनय क्षेत्रातला त्याचा प्रवास ओघानेच घडून आलेला पाहायला मिळाला.

कारण अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही त्याने मालिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. मॉडेलिंगचे वेध लागले असतानाच त्याला मालिकेतून मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकण्याची नामी संधी मिळाली होती. बिग बॉसची तिसऱ्या सिजनची ट्रॉफी आणि २० लाख रोख रक्कम त्याने या शोमध्ये जिंकली होती. त्यामुळे बिग बॉसचा शो विशालच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट देणारा ठरला आहे. विशाल निकम आणि विकास पाटील ह्यांची मैत्री आपल्याला बिगबॉसच्या घराबाहेर देखील पाहायला मिळाली. त्याने घेतलेल्या ह्या नवीन कारमधून हे दोघे लॉंग टूरला जाणार का हेही पाहायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागून आहे. विशालची लोकप्रियता पाहता तो लवकरच कुठलातरी चांगल्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे. या यशस्वी प्रवासासाठी विशाल निकमचे मनःपूर्वक अभिनंदन…