मराठी बिग बॉस मधील या स्पर्धकांच एकमेकांवर आहे जीवापाड प्रेम घरात येण्याआधीच दिलीय प्रेमाची कबुली

मराठी बिग बॉसच्या शोमध्ये काल महेश मांजरेकर यांनी अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांना चांगलंच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात सर्वात जास्त आवाज चढला तो अपूर्वा नेमळेकरचा त्यामुळे तिने ह्या घरातील सर्वांनाच आपल्या मर्जीप्रमाणे वागवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसाद जवादे सोबत तिचा वाद झाला तेव्हा देखील ती तीचंच म्हणणं किती योग्य आहे हे पटवून देताना दिसली. बिग बॉसच्या घरात वादविवाद नेहमीच पाहायला मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे बिग बॉसच्या घरात अनेकांची मनं देखील जुळून आलेली दिसली. अर्थात पुढे जाऊन बिग बॉसच्या घरातून ही मंडळी बाहेर पडल्यानंतर पुन्हा कधी एकत्र पाहायला मिळाली नाहीत मात्र केवळ चर्चेत राहण्यासाठी त्यांनी प्रेमाचे नाटक केले असल्याचे त्यावरून तर्क काढण्यात आले. रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप तसेच तिसऱ्या सिजनमध्ये विशाल निकम आणि सोनाली पाटील यांची प्रेमप्रकरणं गाजलेली पाहायला मिळाली.

परंतु हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट होता असेच चित्र नंतर पाहायला मिळाले. आता चौथ्या सिजनमध्ये देखील सदस्यांमध्ये प्रेमाचे सुरू जुळलेले पाहायला मिळत आहेत ते म्हणजे रुचिरा जाधव आणि रोहित शिंदे यांच्यामध्ये. खरं तर बिग बॉसच्या घरात येण्याअगोदर पासूनच रुचिरा आणि रोहित एकमेकांना डेट करत होते. रोहित हा पेशाने डॉक्टर असून त्याला मॉडेलिंगची विशेष आवड आहे. रुचिराच्या वाढदिवसाच्या दिवशी या दोघांनी एकमेकांच्या प्रेमात असल्याचे जाहीर केले होते. मराठी बिग बॉसच्या घरात येण्याअगोदर म्हणजेच १० सप्टेंबर रोजी मलेशिया येथे ‘मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल पिजंट २०२२’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी विविध देशातून दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. भारत, श्रीलंका, कंबोडिया, कझाकस्तान, फिलिपीन्स, इंडोनेशिया, मलेशिया, नागालँड अशा विविध देशातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेत भारताकडून प्रतिनिधित्व स्वीकारणाऱ्या डॉ रोहित शिंदे याने टॉप ३ मध्ये प्रवेश मिळवला होता. कंबोडियाच्या केलवन फॉक्सने ही स्पर्धा जिंकली असून भारताच्या रोहित शिंदे याने सेकंड रनरअपचा मान पटकावला. डॉ रोहित शिंदे याने या स्पर्धेसाठी गेल्या तीन वर्षांपासून मेहनत घेतली होती. सेकंड रनरअप ठरल्याने त्याची ही मेहनत फळाला आली असल्याचे दिसून आले.

या स्पर्धेअगोदर मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल २०१९ मध्ये त्याने सहभाग घेतला होता. तर काही नामवंत ब्रॅण्डसाठी त्याने रॅम्पवॉक देखील केलं आहे. ‘मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल २०२२’ या स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी रोहित काही दिवसांपूर्वीच मलेशियाला रवाना झाला होता त्याच्यासोबत रुचिरा देखील मलेशियाला गेली होती. या स्पर्धेत उत्तम कामगिरी बाजावल्यानंतर दोघांनी मराठी बिग बॉसच्या घरात सदस्य बनून हजेरी लावली. शोच्या प्रीमिअर सोहळ्यात ग्रँड एन्ट्री करताना या दोघांनी हॉट अँड रोमँटिक डान्स परफॉर्मन्स सादर केला होता. त्यावेळी सोशल मीडियावर वातावरण तापलेलं पाहायला मिळालं होतं. बिग बॉसच्या घरात रुचिरा आणि रोहितच्या प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. हे दोघेही एकमेकांना नेहमीच सपोर्ट करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच हे दोघेही लग्न करणार असल्याचे सांगितले जाते. रोहित आणि रुचिराचा फॅनफॉलोअर्स खूप मोठा आहे. एलिमीनेशन राउंड मध्ये ते त्यांना पुढे जाण्यास नक्कीच सपोर्ट करतील अशी आशा आहे.