मराठी बिग बॉस या रिऍलिटी शोचे अनेक चाहते आहेत. या शोमधून वेगवेगळ्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींना बिग बॉसच्या घरात प्रवेश दिला जातो. बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि स्पर्धकांना दिलेल्या टास्कमध्ये उत्कर्ष शिंदेने बाजी मारलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे या आठवड्याचा कॅप्टन बनण्याचा मान त्याच्याकडे आला आहे. बिग बॉसच्या घरात दादा कोंडके यांचा नातू देखील स्पर्धक बनून आला आहे. ७० ते ८० च्या दशकात दादा कोंडके यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे.

त्यांची तिसरी पिढी म्हणून त्यांचा नातू “अक्षय वाघमारे” हा देखील त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात आला. अक्षय वाघमारेची आज्जी ही दादा कोंडके यांच्या कुटुंबातील सदस्य होत्या. अक्षय वाघमारे हा मूळचा फलटणचा दिसायला हँडसम असलेल्या अक्षयला मॉडेलिंगचे वेध लागले आणि तो पुण्यात येऊन राहू लागला. सुरुवातीला छोट्या मोठ्या आशा तब्बल ६० जाहिरातींमधून त्याने मॉडेलिंगचे काम केले मात्र चित्रपटात त्याला काही प्रवेश मिळेना . मग सेल्समन ते स्पॉटबॉय अशी नोकरी केली अखेर दादा कोंडके यांचा नातू असल्याचे समजल्यावर ‘होऊ दे जरासा उशीर’ या चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर द स्ट्रगलर्स, बेधडक, बस स्टॉप, दोस्तगिरी, युथ, फत्तेशीकस्त असे अनेक चित्रपट त्याच्या हाती लागले. इथे त्याचा हळूहळू जम बसत असतानाच अरुण गवळी यांची लेक योगिता गवळी हिच्या सोबत त्याने मोठ्या थाटात लग्न केले. काही दिवसांपूर्वी अक्षय आणि योगीताला कन्यारत्न प्राप्ती झाली.

त्यावेळी अक्षय आपल्या लेकीला पाहून खूपच भावुक झाला होता. आपल्या लाडक्या लेकीच नाव त्याने ‘अर्णा’ ठेवलं. अर्णा या नावाचा अर्थ आहे लक्ष्मी. अर्णाचा जन्म झाला त्यावेळी नाव काय ठवायचं याची शोधाशोध सुरू झाली होती तिचा जन्म शुक्रवारचा असल्याने अर्णा या नावावर त्याने शिक्कामोर्तब केला होता. सध्या बिग बॉसच्या घरात अक्षय आपल्या लेकीला मिस करताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात जाताना आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो त्याने सोबत ठेवला आहे. बहुतेकांना अक्षय हा दादा कोंडके यांचा नातू आहे हे माहीत नव्हते परंतु दादा कोंडके यांची तिसरी पिढी कलाक्षेत्रात सक्रिय असल्याचे पाहून प्रेक्षकांनी आता आनंद व्यक्त केला आहे.