
झी मराठीची आणि प्रेक्षकांचीही दिवसाची सुरुवात ही “राम राम महाराष्ट्र” या कार्यक्रमाने होत असते. झी मराठी वाहिनीच्या “राम राम महाराष्ट्र” या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून भगरे गुरुजी हे ‘वेध भविष्याचा’ या सेगमेंटमधून राशी भविष्य सांगताना दिसले आहेत त्यामुळे भगरे गुरुजी बहुतेक सर्वांच्याच परिचयाचे बनले आहेत. वेध भविष्याचा या सेगमेंट मधून आजचे राशी भविष्य कसे असेल याचे भाकीत करताना पाहायला मिळतात. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांचे गुरुकुलमध्ये शिक्षण झाले आहे. ज्योतिषी आणि वेदशास्त्र याबाबत त्यांचा गाढा अभ्यास असून त्यांनी ग्रंथ आणि पुस्तके देखील लिहिली आहेत. सध्या “घेतला वसा टाकू नको” या झी मराठीवरील मालिकेतून ते कथा विस्ताराचे काम करत आहेत. आज त्यांच्याबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात…

पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी हे त्यांचे पूर्ण नाव असून नाशिक जिल्ह्यातील पंचवटी येथे त्यांचे स्वतःच्या नावे प्रतिष्ठान आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की पंडित भगरे गुरुजींची कन्या मराठी सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेतील श्वेता म्हणजेच अभिनेत्री “अनघा अतुल भगरे” ही भगरे गुरुजींची कन्या आहे. अनघाची आई मोहिनी भगरे या शिक्षिका आहेत शिवाय सामाजिक कार्यात देखील त्या सहभागी आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच अनघावर चांगले संस्कार होत गेले. आईला कलाक्षेत्राची आवड होती त्यामुळे लहानपणापासूनच संस्कृतीक कार्यक्रमात अनघाने सहभाग दर्शवला होता. रंग माझा वेगळा ही तिने अभिनित केलेली पहिलीच टीव्ही मालिका तर ‘अनन्या’ या गाजलेल्या नाटकातूनही ती रंगभूमीवर चमकली आहे. दिसायला अतिशय सुंदर असलेल्या अनघाने नाशिक येथुन आपले शालेय शिक्षण घेतले त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मुंबई येथून तिने मास कम्युनिकेशनची पदवी मिळवली आहे. कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी आणि व्हाट्सएप लग्न या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून तिने काम सांभाळले होते.

याशिवाय काही काळ कोठारे व्हिजन मध्ये पीआर ब्रँड मॅनेजर पदाचा भारही तिने सांभाळला होता. कॅमेऱ्या मागे राहून काम करत असलेल्या अनघाला भविष्यात कॅमेऱ्यासमोर काम करावे लागेल याची कल्पना तिने केली नसावी. सुरुवातीला कॉलेजमधील नाटकांतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते त्यानंतर मुक्तीचमक, निरमा सारख्या व्यावसायिक जाहिरातीत ती झळकली आहे. रंग माझा वेगळा या स्टार प्रवाह वरील मालिकेतून तिला श्वेताची विरोधी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. प्रेक्षकांनाही तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले. या मालिकेमुळे अनघा प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. अभिनय क्षेत्रात मिळालेली ही संधी तिच्यासाठी फारच महत्वाची आहे आणि आता भगरे गुरुजींची कन्या म्हणूनही तिची नव्याने ओळख निर्माण होत आहे. अनघा याबाबत म्हणते की मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण मला खूप लवकर संधी मिळत गेली माझ्या आजूबाजूला अनेक चांगले लोक मिळत गेले त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. अभिनेत्री अनघा भगरे हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा!…