कलर्स मराठीवरील ‘बायको अशी हव्वी ‘ या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदीप वेलणकर, नागेश मोरवेकर, विकास पाटील, मीरा जोशी यांच्यासारखे कसलेले कलाकार या मालिकेला लाभले आहेत. तर गौरी देशपांडे या नवख्या अभिनेत्रीने जान्हवीचे प्रमुख पात्र साकारले आहे. मालिकेत आपले ध्येय साध्य करण्यासाठी विभासचे पात्र जान्हवीला आपल्या जाळ्यात ओढताना दिसत आहे. आज विभासच्या रिअल लाईफ स्टोरीबद्दल जाणून घेऊयात…

मालिकेत विभासचे पात्र साकारले आहे अभिनेता विकास पाटील याने. विभासचे पात्र या मालिकेतून विरोधी भूमिका दर्शवताना दिसत आहे. पुरुषांची मक्तेदारी समजणाऱ्या शिर्के कुटुंबाचा तो करता धरता असला तरी जान्हवीच्या वडिलांची जमीन बळकावण्यासाठी तो जान्हवीसोबत लग्न करायला देखील तयार आहे असेच संकेत सध्या मिळत आहेत. अभिनेता विकास पाटील याने आजवर अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत प्रथमच तो एका विरोधी भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे. चार दिवस सासूचे ही त्याने अभिनित केलेली पहिली टीव्ही मालिका. त्यानंतर अंतरपाट, कुलवधू, अरुंधती, माझिया माहेरा, स्वप्नांच्या पलीकडले, तू अशी जवळी राहा, वर्तुळ, शेंटिमेंटल, लेक माझी लाडकी, गडबड झाली, तुझ्याविन मर जावा, तुकाराम, अय्या, गोळा बेरीज अशा मालिका आणि चित्रपटातून त्याने महत्वाच्या भूमिका साकारल्या. विकास पाटील मूळचा कोल्हापूरचा परंतु पुण्यातूनच त्याने शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत आणि फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्याने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून सहभाग दर्शवला.

शिवाय कॉलेजमध्ये अनेक एकांकिकामधून उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. चित्रपट मालिका साकारून मराठी सृष्टीतला चॉकलेट हिरो अशी त्याने स्वतःची ओळख निर्माण केली. गडबड झाली हा चित्रपट विनोदी अंगाचा असल्याने या चित्रपटातून त्याने स्त्रीव्यक्तिरेखा चांगलीच रंगवली होती. शिवाय तुझ्यात जीव रंगला या मालिकेत तो एका छोट्या भूमिकेत झळकला होता. अभिनेता विकास पाटीलच्या पत्नीचे नाव स्वाती. ६ डिसेंबर २०१० रोजी तो स्वातीसोबत विवाहबद्ध झाला. मौर्या हे त्याच्या मुलाचे नाव. गेल्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याने पहिल्यांदाच आपल्या पत्नीसोबतचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. प्रथमच पत्नीचा फोटो शेअर केल्यानंतर त्यांच्यावर चाहत्यांसह सहकलाकारांनीदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला होता. ‘बायको अशी हव्वी’ या मालिकेतील विभासच्या भूमिकेसाठी आणि पुढील प्रवासासाठी अभिनेता विकास पाटीलला खूप खूप शुभेच्छा…