कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं ‘ ही मालिका जवळपास तीन वर्षाहून अधिक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अनेक कलाकारांनी छोट्या मोठ्या पण तितक्याच महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या आहेत. बाळूमामांची भूमिका अभिनेता सुमित पूसावळे याने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवली आहे त्यामुळे सुमित पुसावळे तमाम प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला आहे. बाळू मामाच्या नावानं चांगभलं ही त्याने प्रमुख नायक म्हणून साकारलेली पहिलीच मालिका आहे. या मालिकेअगोदर सुमितने झी मराठीवरील लागिरं झालं जी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते मात्र या मालिकेत तो छोट्याशाच भूमिकेत पाहायला मिळाला होता.

मालिकेचा नायक अजिंक्य शिंदे जेव्हा ट्रेनिंग घ्यायला जात असतो त्यावेळी तेथे त्याची गाठ सुम्यासोबत होते. सुम्याचे पात्र मालिकेत विरोधी भूमिका साकारणारे होते. ही भूमिका सुमित पुसावळेने निभावली होती. सुमित पूसावळे हा मूळचा दिघंजी गावचा. शालेय शिक्षणानंतर सुमित पुण्यात आला. इथे त्याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी मिळवली आणि काही काळ याच क्षेत्रात नोकरी केली. त्याला स्वतःचे रेस्टॉरंट उभारायचे होते मात्र लहानपणापासूनच शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण घेत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने त्याला कलाक्षेत्राची ओढ लागली. मुंबईला गेल्यावर त्याला हिंदी चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. सरगम या चित्रपटातुन तो झळकला होता. त्यानंतर लागीरं झालं जी, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून तो प्रकाशझोतात आला. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून मुख्य भूमिका साकारून सुमित पुसावळे प्रसिद्धी मिळवताना दिसला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत त्याने आपल्या खास मैत्रिणीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्यावरून तो प्रेमात पडला असल्याची चर्चा सध्या रंगली आहे त्यामुळे सुमित पूसावळे सध्या चांगला चर्चेत आला आहे.

सुमितची ही खास मैत्रीण आहे दिशा परदेशी. दिशा परदेशी ही मराठी मालिका अभिनेत्री आहे. शिवाय काही ज्वेलरी आणि साड्यांच्या ब्रॅण्डसाठी तिने मॉडेलिंग केले आहे. २०१६ साली इंडियन हेअर अँड ब्युटी या सौंदर्य स्पर्धेत तिने सहभाग दर्शवला होता हा किताब तिने त्यावेळी पटकावला होता. स्टार प्रवाहवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत दिशा परदेशी हिने निहारिकाचे पात्र साकारले आहे. निहारिका हे पात्र मालिकेत विरोधी भूमिका दर्शवत आहे. या मालिकेव्यतिरिक्त दिशाने टीव्ही जाहिरात क्षेत्रात देखील मॉडेलिंगचे काम केले आहे. सुमितसह दिशाने देखील दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्यावरून हे दिघेही एकमेकांना डेट करत असल्याचा चर्चाना उधाण आलं आहे. कलाकारांची प्रसिद्धी वाढली कि अश्या चर्चा रंगताना नेहमीच पाहायला मिळतात पण खरंतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्री नववर्षा निमित्त एकमेकांच्या भेटीगाठी घेतात एकत्रित पार्टीकरताना पाहायला मिळतात. ह्यात नवीन असं काहीच नाही शिवाय यापूर्वी दोघांचे एकत्रित फोटो देखील पाहिले गेले नाहीत. .