उगाच नाही या शाळेतल्या मुलांनी पुढे जाऊन मराठी इंडस्ट्रीत स्थान मिळवलं.. वार्षिक स्नेहसंमेलन असावं तर असं
सध्या सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी बॉलिवूडचे सेलिब्रिटी त्यांच्या मुलांचे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी अंबानीच्या शाळेत दाखल झाले होते. करीना कपूर, शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांच्या मुलांचे हे स्नेहसंमेलन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. पण या अंबानीच्या शाळेपुढे आपल्या मराठी शाळेतली मुलंही कुठे कमी दिसली नाहीत हे विशेष. मराठी इंडस्ट्रीत बरचसे कलाकार या शाळेत प्राथमिक शिक्षण घेताना दिसले. फक्त कला क्षेत्र म्हणून नाही तर इथल्या शाळेतल्या मुलांनी अधिकारी, राजकारणी, वकिलही घडवले आहेत. तुम्ही बरोबर ओळखलं असेल. ही शाळा म्हणजे “बालमोहन विद्यामंदिर”.
सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, प्रिया बापट, स्पृहा जोशी ते अगदी राज ठाकरे यांनी या शाळेत शिक्षण घेतलं होतं. खरं तर खारीचा मोठा वाटा असलेल्या विद्याताई पटवर्धन या शाळेच्या माजी शिक्षिका, त्यांनीच या शाळेतील मुलांना अभिनयाची वाट दाखवून दिली. पण विद्याताईंच्या पश्चातही इथले शिक्षक मुलांवर तेवढीच मेहनत घेताना दिसत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या बालमोहन शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात डॉ अमोल कोल्हे यांना जाण्याची संधी मिळाली. तिथल्या या चिमुकल्या मुलांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली. मुलांनी इंग्रजी भाषेतून केलेले हे सूत्रसंचालन पाहून तर अमोल कोल्हे अवाकच झाले.
हिंदी, मराठी, इंग्रजी अशा भाषेवर मुलांचे प्रभुत्व पाहून आणि नृत्यामध्ये एकसंगता पाहून त्यांचा व्हिडीओ काढण्याचा मोह अमोल कोल्हे यांना आवरला नाही. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. अर्णव फडके आणि ईरा पाटणकर यांनी केलेले इंग्रजी भाषेतील सूत्रसंचालनाचे ते तर फॅनच झाले. आत्मविश्वास, भाषेवर प्रभुत्व आणि कमाल शब्दोच्चाराने ते भारावून गेले. अर्थात यामागे असणारे शिक्षक आणि मुलांच्या पालकांचेही त्यांनी इथे कौतुक केले. वार्षिक स्नेहसंमेलन असावं तर असं!…अशीच एक प्रतिक्रिया या स्नेहसंमेलनाच्या बाबतीत दिली जात आहे.