२०१८ साली भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित “बबन” हा मराठी चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. साज ह्यो तुझा…, जगण्याला पंख फुटले…, गोडी मधाची…, मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं… अशी या चित्रपटातील सर्वच गाण्यांना प्रेक्षकांकडून तुफान लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटाची नायिका गायत्री जाधव हिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात.. बहुतेक चित्रपटाच्या कलाकारांची निवड ही ऑडिशनमधून केली जाते मात्र गायत्री जाधव या बाबतीत वेगळी ठरली कारण गायत्री तिच्या आई सोबत चित्रपट पाहायला चालली होती.

रस्त्याने जात असताना दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची नजर गायत्रीवर पडली आणि बबन चित्रपटाच्या नायिकेसाठी तिची निवड करण्यात आली. “बबन” चित्रपटाने आणि त्यातील गाण्याने गायत्रीला अमाप प्रसिद्धी मिळवुन दिली. या चित्रपटाखेरीज गायत्री आणखी एका चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. हा चित्रपट होता “राजकुमार”. राजकुमार हा चित्रपट १६ जुलै २०२१ रोजी युट्युबवर प्रदर्शित करण्यात आला. युट्युबच्या माध्यमातून चित्रपट प्रदर्शित होणं अस इतिहासात पहिल्यांदाच घडलेलं पाहायला मिळालं. थेटर बंद असल्या कारणाने केवळ मराठी चित्रपट पुढे यावा याच हेतूने चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला होता. राजकुमार या चित्रपटात गायत्री जाधव आणि भाऊसाहेब शिंदे यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकली. या चित्रपटाला प्रवीण तरडे, देविका दफतरदार, बालकलाकार श्रीनिवास पोकळे यांचीही साथ मिळाली होती. युट्युबच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट युट्युबवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना केवळ ९९ रुपये मोजावे लागणार होते. अभिनेत्री गायत्री जाधवने ३० जून २०२० रोजी देवेंद्र मुरकुटे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. शासनाच्या निर्बंधांमुळे तिच्या या लग्नाला मोजक्याच नातेवाईक आणि मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या ती आपल्या कुटुंबासोबत पुण्यातच वास्तव्यास आहे. गायत्री विवाहबद्ध झाली असली तरी आणखी कुठला प्रोजेक्ट तिला मिळाला तर ती निश्चितच त्यात काम करेल.