‘स्थळ पुणे’ म्हटलं की पुणेरी पाट्या आणि पुणेकरांची टोमणे मारण्याची खास शैली सातासमुद्रापार प्रचलित आहे. अशाच पुणेकरांच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न ‘स्थळ पुणे’मधून काही तरुणांनी घेतला आहे. पुणेकरांच्या शैलीत मजेशीर व्हिडीओ बनवून ही तरुणाई आज त्यांच्या लाखो फॉलोअर्सना हसवत आहेत. अथर्व सुदामे आणि डॅनी पंडित हे दोन तरुण आपल्या विशिष्ट शैलीतून मजेशीर व्हिडीओ बनवतात आणि या छोट्या छोट्या व्हिडीओतून ते प्रेक्षकांना लोटपोट करतात. डिजिटल क्रिएटर असलेल्या अथर्व सुदामे आणि डॅनी पंडित यांच्या व्हिडिओजना सोशल मीडियावर लाखो लोकांची पसंती मिळत आहे. या दोघांनाही नवनवीन व्हडिओज बनवण्याची भारी हौस होती.

डॅनी लहान असल्यापासूनच व्हिडीओ बनवत होता मात्र इन्स्टाग्राम आणि युट्युबमुळे त्यांना आपली कला सादर करण्याचा एक हक्काचा प्लॅटफॉर्म मिळाला. स्किट लिहून त्याचे सादरीकरण कसे करावे याकडे त्यांचा जास्त कल असतो. अगदी साधा दुकानदार , प्रसिद्ध वैशाली हॉटेल ते गजबजलेला एफसी रोडवर देखील त्यांनी भन्नाट रिल्स बनवले आहेत. रोजच्या जीवनात असे अनुभव घेतलेल्याना त्यांचे हे रिल्स खूप भावतात. त्याचमुळे त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अथर्वचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ७८ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत तर डॅनी पंडितचे २ लाख १४ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत. मराठी सृष्टीतील मोठमोठ्या सेलिब्रिटींना देखील त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओजची भुरळ पडली आहे. हे व्हिडीओज बनवण्यासाठी त्यांनी कधी कोणाची मदत घेतली नाही. कारण स्वतःच्या टॅलेंटवर त्यांना मोठा विश्वास होता. सोशल मीडिया स्टार, मॉडेल अशी त्यांनी एक वेगळी ओळख मिळवली आहे. दोन दिवसांपूर्वी अथर्वचा ऋचा जोशी सोबत साखरपुडा पार पडला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. बी ई रोजगार या वेबसिरीजमध्ये डॅनी झळकला आहे. काही ब्रॅण्डसाठी त्यांनी आपल्या खास शैलीत जाहिराती देखील केल्या आहेत. ही प्रसिद्धी त्यांना सहजासहजी मिळालेली नाही यामागे त्यांची अपार मेहनत फळाला आली असेच म्हणावे लागेल.

सोशल मीडियावर प्रेक्षक चांगल्या वाईट अशा दोन्ही प्रतिक्रिया देत असतात. हा अनुभव या दोघांनीही घेतला आहे. चाहत्यांच्या चांगल्या, वाईट प्रतिक्रिया नेहमीच प्रेरणा देतात असे हे दोघेही म्हणतात. मात्र यातून अधिक चांगला कंटेंट कसा बनवायचा याचा ते प्रयत्न करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावता येतात त्यामुळे या क्षेत्राकडे सर्वांचा कल वाढला आहे मात्र हे ध्येय्य गाठण्यासाठी त्यामागे त्यांची अपार मेहनत देखील आहे हे विसरून चालणार नाही. शिवाय आपण करतोय त्यात आपल्याला यश मिळेलच असं नसतं त्यामुळे अनेकजण असे रिल्स बनवून मधेच कंटाळून हार मानतात. पण अथर्व आणि डॅनी या दोघांना मित्रांची तितकीच साथ मिळाली हे सगळे एकमेकांना जोडून आहेत हेच त्यांच्या यशा मागचं कारण आहे. असो दोन दिवसांपूर्वी अथर्वचा ऋचा जोशी सोबत साखरपुडा पार पडला. अथर्व आणि ऋचा दोघांना खूप खूप शुभेच्छा…