१९८७ साली सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंमत जंमत’ हा सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाला होता. सचिन पिळगावकर, वर्षा उसगावकर, अशोक सराफ, चारुशीला साबळे, सुधीर जोशी, आशालता वाबगावकर या कलाकारांनी हा चित्रपट त्यांच्या अभिनयाने सजग केला होता. गीतकार शांताराम नांदगावकर आणि अरुण पौडवाल यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटाने अश्विनी ये ना, चोरीचा मामला, मी आले निघाले अशी सुमधुर गाणी दिली. अश्विनी ये ना हे अजरामर गीत अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित झालं.

हे गाणं या दोघांसाठी माईलस्टोन ठरलं होतं. अशोक सराफ यांच्यावर अनेक गाणी चित्रित झाली आहेत मात्र अश्विनी ये ना या गाण्याची गोष्टच वेगळी आहे. कारण किशोर कुमार यांनी प्रथमच हे गाणं गाऊन मराठी सृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले होते. या गाण्यामध्ये किशोर कुमार यांना अनुराधा पौडवाल यांची साथ मिळाली होती. हे गाणं गाण्यासाठी किशोर कुमार यांची एक अट होती. अर्थात ही अट त्यांच्या शब्दांच्या उच्चाराशी संबंधित असल्याने मूळ गाण्यात बदल करण्यात आले होते. किशोर कुमार हे बंगाली भाषिक असल्याने त्यांना गाणं गाताना ‘च’ आणि ‘ळ’ या शब्दाचा उच्चार करणे अवघड जात होते. त्यामुळे गाण्यात जिथेजिथे च शब्द आला असेल त्या ठिकाणी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरण्यात आला होता. ही जवाबदारी गीतकार शांताराम नांदगावकर यांनी बजावली होती. म्हणूनच अश्विनी ये ना…या गाण्यात कुठेच ‘च’ आणि ‘ळ’ हा शब्द तुम्हाला सापडणार नाही. किशोर कुमार यांनी पहिलं मराठी गाणं गायलं आणि त्या गाण्यात आपण झळकलो म्हणून अशोक सराफ भलतेच खुश होते.

या गाण्याच्या वेळी किशोर कुमार यांनी इथून पुढे मी अशोक सराफ यांना आवाज देईल असे त्यांनी सचिनकडे बोलून दाखवले होते. त्यानंतर माझा पती करोडपती या चित्रपटात किशोर कुमार यांनी अनुराधा पौडवाल यांच्यासोबत तुझी माझी जोडी जमली…हे गाणं गायलं होतं. ह्या गाण्यात देखील अशोक सराफ झळकले होते. मात्र त्यानंतर किशोर कुमार यांचे निधन झाले आणि यामुळे अशोक सराफ यांचे आणखी एकदा त्यांच्या गाण्यावर थिरकण्याचे स्वप्न भंगले. ही आठवण अशोक सराफ यांनी नुकतीच मराठी इंडियन आयडॉलच्या मंचावर करून दिली होती. सोनी मराठीवरील इंडियन आयडॉलच्या सोमवार ते बुधवारच्या विशेष भागात अशोक सराफ हजेरी लावत आहेत. या मंचावर स्पर्धकांनी त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी गायली आहेत. या गाण्यांच्या काही खास आठवणी अशोक सराफ सांगताना दिसणार आहेत. त्यामुळे त्याची उत्सुकता प्रेक्षकांना देखील लागून राहिली आहे.